You are currently viewing जाती पल्याडचं नातं.

जाती पल्याडचं नातं.

*काव्यप्रेमी महाराष्ट्र समूहाचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*जाती पल्याडचं नातं.*

 

(सत्य कहानी.)

 

1989 चा मे महिना तब्बल 36 वर्षे पूर्ण झाली.दादा रोज आकुडक्या तपकिरी चड्डीच्या खिशात एक दोन,एक दोन आंबे घेऊन यायचा आणि म्हणायचा अण्णा!!! ही घ्या आंबा.पटकन चड्डीच्या खिशातून आंबा काढायचा अन हातावर ठेकवायचा.सुंदर चेहरा.घारे डोळे.हळव मन.गोड स्वभाव.पाहायला गेलं तर अमेरिकेतलं लेकरू दिसावं इतकं देखनं.

एक दिवस गेला आंबे आणले. दुसरा गेला,तिसरा गेला,रोज एक दोन,एक दोन आंबे घेऊन यायचा आणि तेवढ्याच प्रेमाने मला खायला द्यायचा.मला जरा प्रश्नच पडला की, हा दादा रोज आंबे कसा काय आणतो? आई-वडिलांनी दिले असते तर,चार-पाच तरी दिले असते.मात्र तसं दिसेना.म्हणून शहानिशा करायचं ठरवलं.

ही कहाणी कुठून आली. हा प्रश्न तुम्हाला पडेल.त्याच्याच आधी सांगून मोकळे होतो.

माझ्या धर्मगुरू बद्दल आता वेगळं सांगायची गरज नाही. ते तुम्हाला परिचित आहेत.त्यांचं नाव विश्वनाथ (अण्णा) तोडकर. यांच्या सोबत समाज सेवा करायची म्हणून बीएच शिक्षण पूर्ण झालं आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भोगजी हे गाव गाठलं.

गावातल्या माणसांचा तसा मी परिचित होतो.राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मागच्याच दोन-तीन महिन्यात त्याच गावात पूर्ण झालेलं.

गावी गेलो.दोन-तीन दिवस मधुकर च्या घरीच मुक्कामाला होतो.नंतर आता राहायचं कुठं? तर गावातल्या लोकांनी अर्ध उघडं घर मला राहण्यासाठी दिल.ज्या संघटनेत मी राहिलो,वाढलो त्या संघटनेचे नाव होतं जाणीव संघटना.पूर्णवेळ समाजसेवा करायची म्हणून मी आणि कैलासवासी मधुकर धस आम्ही दोघांनीही एकाच दिवशी जाणीव संघटना जॉईन केली. सहाशे रुपये मानधन मिळणार होते ते आम्ही दोघांनी 300- 300 रुपये वाटून घेन्याच निर्णय घेतला.अंगावर कापड,पोटभर जेवायला अशी सोय झाली की आयुष्यभर समाज सेवा करायची, म्हणूनच निर्णय घेतला आणि माझं स्वतःचं सातेफळ हे जन्मगाव सोडलं.

मातीने बांधलेली दहा पत्र्याची एक रूम गावातल्या गोड माणसानं मला राहण्यापूर्ती दिलेली.त्यावरती आतल्या बाजूला पाच पत्रे घातलेले आणि पाच पत्र्याची जागा उघडीच.जर पाऊस आला तर तो घरात पडावा.आणि उतरत्या वाटणी उंबऱ्याच्या खालून तो बाहेर जावा.अशा पद्धतीचं सुखकर निवासालय लोकांनी माझ्यासाठी अर्पण केलं होतं.तिथं मी राहावं. कधी कधी अण्णा मला आणि मधुकर यांना भेटायलला यायचे.मी त्यांना भाजी चपाती करून पोटभर खाऊ घालायचो.चपाती छान दिसावी म्हणून मी पिठामध्ये हळद मिसळायचो.तेव्हा ते चवीने खायचे. आशीर्वाद द्यायचे.शब्दातला गोडवा. पाठीवरती मायेची थाप आणि विचाराची ऊर्जा देऊन जाणारं व्यक्तिमत्व यातूनच तर आमचं आयुष्य सुवर्ण अलंकारांनी जडित होऊन गेलं.

मग मी जिथं रहायचो तिथं दादा माझ्याकडे आंबे घेऊन यायचा आता तुम्ही पुन्हा प्रश्न विचारणार हा दादा कोण. त्या दादाचं नाव काय?तर त्यांचं नाव दादासाहेब खराटे. त्यावेळी दादाचं वय सहा ते आठ वर्षाचं वय असेल.आता तोच दादा एडवोकेट म्हणून कळंबच्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो.

मला प्रश्न पडला दररोज रोज दोन दोन आंबे दादा कसा काय घेऊन येतो, संशय आला म्हणून आई-वडिलांना भेटायचं ठरवलं. गावातल्या चौकातच समोरच्या बाजूला दादाचं सुंदर घर.थंडगार माळवद.सेना मातीने स्वच्छ सारविलेलं.आत मध्ये गेला की शांत वाटावं.जसं घरात गेलं की शांत वाटावं. तसेच दादाचे आई-बाबा देवगुनी माणसं. मी घरात गेलो. आई, बाबा होतेच .या अण्णा या!!! म्हणून दादाच्या वडिलांनी म्हणजे (अण्णांनी) हाक मारली. मी आत जाऊन बसलो. घरात पिकलेल्या आंब्याचा दरवळ पूर्ण घरात पसरलेला.आपसूकच आंबे खायची इच्छा झालेली. मागण्याची सोय नव्हती.कारण मी तशा अर्थाने गावामध्ये नवखाच होतो.मावशी उठल्या टॉपल्यात पाणी टाकलं.पाच-सहा आंबे समोर आणून ठेवले. मग काय आंबे खायला सुरू केलं.

बोलता बोलता मी म्हटलं मावशी -अण्णा दादाकडे आतापर्यंत माझ्यासाठी किती आंबे पाठवले? दोघांनीही संशयानं माझ्याकडे पाहिलं आणि दोघेही म्हटले नाही कधीच नाही.मी दादाकडे पाहिलं. दादांनी माझ्याकडे हसत हसत पाहिलं. मी म्हणलं अहो दादा रोज आंबे आणून खाऊ घालतो मला . तुम्ही दिल्याच शिवाय कसा खाऊ घालेल? मावशी म्हणल्या अण्णा तुमच्यावर दादा खूप प्रेम करतो, म्हणून तो आम्हाला न विचारता आंबे घेऊन येत असेल.तेव्हा घरच्यांना कळलं की दादा माझ्यावरती किती प्रेम करतो. सर्वांचेच मन भाऊक झालं होतं. माझ्या कार्याची सुरुवात त्यातच मी भरून पावलो होतो.मग बोलत बोलत मनसोक्त आंबे खाल्ले मनाची आणि पोटाची शांतता होईपर्यंत.

आज तब्बल 35 वर्षानंतर त्याच प्रेमाची आठवण झाली. त्या गावांमध्ये माझी जात कोणालाही माहीत नव्हती. माझा धर्म मात्र प्रत्येकाला माहिती होता. कारण त्याच गावांमध्ये जाणीव संघटनेच्या विचाराचे वादळ निर्माण झालं होतं. परिवर्तनाची लाट त्या गावातून कैक शेकडो मैल लोकांच्या हक्कासाठी, जागृतीसाठी, रोजगार हमीच्या कामासाठी लोक संघटन, बांधणी आणि संघर्ष यासाठी निर्माण झाली होती. त्याच दादाची आज खुप आठवण येते आहे. प्रेमाला जात नसते. प्रेमाला धर्म नसतो. प्रेमाला रंग नसतो.असते फक्त अंतर्मनातील जिव्हाळ्याची,माणुसकीची, मायेची सावली…..

प्रतिक्रिया व्यक्त करा