उबाठा व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर राजकीय स्टंटबाजीचा आरोप; शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचा दावा
देवगड :
जामसंडे येथे उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या लोकांनी केलेले आंदोलन व कृतीचा भाजपच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी आमदार ॲड. अजित गोगटे व भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिला.
जामसंडे येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संदीप साटम यांनी जामसंडे येथे करण्यात आलेल्या आंदोलनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन व कृतीचा निषेध करून वरिष्ठ नेत्यांबाबत बेताल वक्तव्य केल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई व जामसंडे येथे झालेल्या आंदोलनांमध्ये बागायतदार व सर्वसामान्य शेतकरी नव्हते. ही आंदोलने पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होती. कोकणाच्या इतिहासात प्रथमच तापमानातील कमी-जास्त प्रमाण, कीड प्रादुर्भाव आदी निकषांच्या आधारे नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानभरपाई वाढवून देण्यासाठीही सकारात्मक आहे. मात्र याचे कौतुक विरोधकांना कधी वाटले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन कमी पटसंख्येमुळे बंद पडणाऱ्या शाळा सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याबाबत विरोधकांनी कौतुक करण्याऐवजी राजकारण केल्याचा टोला साटम यांनी लगावला. “शाळा वाचवल्या तर पालकमंत्र्यांचा सत्कार करू,” असे वक्तव्य विरोधकांनी केले होते. आता निर्णय झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार करावा व सत्काराचा दर्जा कळू द्यावा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
आंदोलन करणारे उबाठा काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामध्ये बागायतदार व शेतकरी नव्हते. राज्य सरकारने निकष बदलून मदत जाहीर केली असून कर्जमाफीची घोषणाही केली आहे. बागायतदारांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांनी केले. तसेच “महाराष्ट्राच्या स्टाईलने येथे आंदोलने करू नयेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेवक शरद ठाकूरल, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, योगेश पाटकर आदी उपस्थित होते.
