*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काही न बोलता कळतं…*
काल रातीला सपनात आलं झाड एक ते बाई
मी काय म्हणतो ऐकून घे ना थांब जरा तू ताई…
काय रं बाबा सेवा केली
लई लई दिवस तू माझी
काय नगं सांगू माहित हाय रं
मला ते सर्व काही…
फुलं दिली तू फळं किती रं
नाहीच त्याची गणती
छत्र धरूनी सावलीचे तू
उन्हात तळपत राही…
पक्षी प्राणी अवघ्यांचा तू
आहेस बाबा दाता
उपकाराची फेड कशी मी
करू तू सांग ना आता..
बोलत नाही देतच जातो
तरी कुऱ्हाडी पडती
तुझ्यामुळे रे सुंदर आहे
वसुंधरा ही धरती..
चुलीत जळतो स्मशानातही
लक्ष ती वर्षे झाली
घरात तुझ्याच रे आम्ही राहतो
किंमत नाही केली…
नको तू बोलू नको तू सांगू तू न बोलता कळतं
नि:स्वार्थ तुझी रं पाहून सेवा अंतरंग रं जळतं..
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
