You are currently viewing ‘स्वगणना २०२७’ मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप

‘स्वगणना २०२७’ मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप

‘स्वगणना २०२७’ मध्ये वाभवे-वैभववाडी शहराची दैदिप्यमान झेप

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले शहर;

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला यशाची साथ

 सिंधुदुर्गनगरी  

स्वगणना २०२७ अभियानात वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे पहिले शहर होण्याचा मान मिळवला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासनाने राबविलेल्या प्रभावी जनजागृती मोहिमेमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली.

नगरपंचायत वाभवे-वैभववाडीचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत विशेष स्वगणना सहाय्य पथके तयार करून नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण केली. शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वगणनेचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला.

बॅनरद्वारे प्रसिद्धी, घरोघरी जाऊन पथकांकडून प्रबोधन, कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तत्काळ स्वगणना पूर्ण करून घेणे तसेच प्रभागनिहाय लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेणे अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांना स्वगणनेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने नगरपंचायत क्षेत्रातील वास्तव्यास असलेल्या सर्व ४०४ कुटुंबांची स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण झाली.

या यशामागे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. तसेच नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, सर्व नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी व सहाय्य पथकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांनी व्यक्त केली.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून कोणतेही उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य होऊ शकते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा