स्वगणना मोहिमेत सावरजुवा गावाची शंभर टक्के कामगिरी;
*नानोस व कोंडुरे येथेही उत्साहपूर्ण प्रतिसाद*
*बांदा*
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्वगणना २०२६ मोहिमेला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक स्वतःहून सहभाग नोंदवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक यंत्रणेच्या समन्वयातून सजा आजगाव परिसरात स्वगणनेचे काम वेगाने सुरू असून अनेक गावांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
सजा आजगाव अंतर्गत येणाऱ्या सावरजुवा गावात एकूण ४७ घरे व ५७कुटुंबे आहेत. विशेष म्हणजे सर्व ५७कुटुंबांची स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण झाली असून गावाने शंभर टक्के स्वगणना पूर्ण करण्याचा मान मिळविला आहे. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि संबंधित यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाली.
तसेच नानोस गावात एकूण १४३ कुटुंबांपैकी ६४ कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली असून उर्वरित कुटुंबांची नोंदणीही वेगाने सुरू आहे. याशिवाय कोंडुरे गावातील ४८परिवारांची स्वगणना पूर्ण करण्यात आली आहे.
या संपूर्ण मोहिमेसाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच आजगाव मंडळ अधिकारी अर्जुन गावडे, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप बर्गे व डी. पी. पास्ते यांच्यासह महसूल सेवक, पोलीस पाटील आणि सीपीआर यांनीही परिश्रमपूर्वक काम करत मोहिमेला गती दिली आहे.
स्वगणना प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा वाढता सहभाग आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे स्वगणना २०२६ मोहीम प्रभावीपणे राबविली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
