You are currently viewing यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न….

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न….

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा ७ वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न….

“​यशस्वी होण्यासाठी सातत्य आणि प्रामाणिकता आवश्यक” : नगराध्यक्षा श्रद्धा भोसले

सावंतवाडी

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या २०२१–२५ या बॅचमधील विद्यार्थ्यांचा दीक्षांत सोहळा आज आनंद, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भोसले नॉलेज सिटीतील आचार्य चरक ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा भोसले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ.विजय जगताप, समन्वयक प्रा.नमिता नार्वेकर, प्रा.प्रणाली जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली. सर्वांनी पदवीदान समारंभाचा पोशाख परिधान केल्याने वातावरण अधिक भव्य आणि औपचारिक झाले होते.

आपल्या भाषणात श्रद्धा भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की, यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम आणि प्रामाणिकता या गुणांची आवश्यकता असते. आपल्या निवडलेल्या क्षेत्राशी निष्ठा ठेवून परिश्रम केल्यास कोणतीही उंची गाठता येते. शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून समाजासाठी जबाबदारीने काम करण्याची तयारी आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा असेही त्या म्हणाल्या. यावेळी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.नमिता नार्वेकर यांनी दीक्षांत समारंभाचे महत्व आणि वैशिष्ट्ये अधोरेखित केली. डॉ.विजय जगताप यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षण देत जिल्ह्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. यावेळी संजीव देसाई आणि रत्नेश सिन्हा यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालक प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करताना संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासोबतच चांगले संस्कारही दिल्याचे नमूद केले.

समारंभाचा मुख्य क्षण म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि पालकांच्या डोळ्यांत अभिमान स्पष्ट दिसत होता. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याची शपथ देखील देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रणाली जोशी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा