You are currently viewing सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची नवी रुग्णवाहिका लोकार्पित

सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची नवी रुग्णवाहिका लोकार्पित

सावंतवाडीत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची नवी रुग्णवाहिका लोकार्पित

‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या ब्रीदाखाली मोफत सेवेसाठी उपक्रम; युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी :

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाचे औचित्य साधत नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आली.
यावेळी बोलताना युवराज भोसले म्हणाले की, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून रुग्णांना दिली जाणारी मदत अमूल्य असून अशा सेवाभावी कार्याची समाजाला मोठी गरज आहे. सावंतवाडीतील आरोग्य समस्या लवकरच दूर होतील आणि जनतेच्या प्रयत्नांना यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी सांगितले की, कै. अनिल उर्फ आबा परूळेकर यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले असून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. ही सेवा पूर्णतः मोफत देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत रुग्णवाहिकेमुळे रुग्णसेवेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनीही बेवारस रुग्णांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत प्रशासनालाही याचा मोठा फायदा होत असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास युवराज लखमराजे भोंसले, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उद्योजक शैलेश पै, सामाजिक कार्यकर्ते आनंद रासम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा