१४ कोटी ७२ लाखांच्या मूळ अंदाजपत्रकात १९ कोटी ६१ लाखांची भर; विविध विभागांसाठी मोठी तरतूद
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६१ लाख ९८ हजार ७०० रुपयांची भरीव वाढ करण्यात आली असून सुधारित अंदाजपत्रक आता ३४ कोटी ३४ लाख ७९ हजार ३४५ रुपयांवर पोहोचले आहे. या सुधारित अंदाजपत्रकास आज वित्त समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून अंतिम मान्यतेसाठी ते जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद वित्त समितीची बैठक येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वित्त समिती सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजीत पिसाळ, सदस्य संजय बोबडी, सुदन कवठणकर, सोनाली घाडीगावकर, वर्षा सांबारी, क्षमा हडकर, सावी लोके, कोषागार अधिकारी अमित मेश्राम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक कालावधीत तयार करण्यात आलेल्या मूळ अंदाजपत्रकात शासनाकडून ३१ मार्च रोजी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने मोठी वाढ करण्यात आली. परिणामी जिल्हा परिषद स्वउत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.
सुधारित अंदाजपत्रकात विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली असून त्यात अध्यक्ष पदासाठी १ कोटी ७५ लाख ४ हजार ३०० रुपये, सामान्य प्रशासनासाठी १ कोटी ४ लाख ४३ हजार ५०० रुपये, शिक्षण विभागासाठी १ कोटी ९४ लाख ३० हजार ५०० रुपये, बांधकाम विभागासाठी सर्वाधिक ८ कोटी २० लाख ८१ हजार ७०० रुपये, लघु पाटबंधारे ५५ लाख ५ हजार २०० रुपये, आयुर्वेद ६ लाख रुपये, आरोग्य १ कोटी २६ लाख १७ हजार ८०० रुपये, ग्रामीण पाणी पुरवठा १ कोटी ३५ लाख रुपये, कृषी २ कोटी १५ लाख ६८ हजार ६०० रुपये, पशुसंवर्धन २ कोटी ७ लाख ४१ हजार ३०० रुपये, समाज कल्याण ६ कोटी ३ लाख ८२ हजार ७०० रुपये, महिला व बाल विकास २ कोटी ३८ लाख ५० हजार ८०० रुपये आदींचा समावेश आहे.
दरम्यान, सभा आयोजित करताना सभागृहाची उपलब्धता तपासून सकाळच्या सत्रात बैठक घेण्याच्या सूचना सभापती संतोष साटविलकर यांनी समिती सचिवांना दिल्या. तसेच अंदाजपत्रकीय निधी योग्य प्रकारे खर्च करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध कामकाज करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
