You are currently viewing घारपी शाळेत उन्हाळी छंद वर्गात पारंपरिक खेळांचा जल्लोष; मोबाईल विसरून विद्यार्थ्यांनी अनुभवला बालपणाचा खरा आनंद!

घारपी शाळेत उन्हाळी छंद वर्गात पारंपरिक खेळांचा जल्लोष; मोबाईल विसरून विद्यार्थ्यांनी अनुभवला बालपणाचा खरा आनंद!

*घारपी शाळेत उन्हाळी छंद वर्गात पारंपरिक खेळांचा जल्लोष; मोबाईल विसरून विद्यार्थ्यांनी अनुभवला बालपणाचा खरा आनंद!*

*बांदा*

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या विळख्यात अडकत चाललेल्या बालविश्वाला पुन्हा एकदा मोकळ्या मैदानाची ओढ लावणारा प्रेरणादायी उपक्रम घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनुभवायला मिळत आहे. उन्हाळी छंद वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळांत रममाण होत बालपणाचा खरा आनंद अनुभवला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, तुकाराम गावडे, एकनाथ गावडे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गोट्या, लगोरी, भिंगरी, विटीदांडू, भोवरा अशा पारंपरिक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. खेळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, मैदानात घुमणारा हशा आणि जिंकण्यासाठीची निरागस धडपड पाहून उपस्थितांच्याही चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
शाळेचा परिसर अक्षरशः उत्साहाने बहरून गेला होता. एकमेकांना दिलेले प्रोत्साहन, संघभावना आणि खेळातील निरागस स्पर्धा यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. हरवत चाललेल्या पारंपरिक खेळांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या खेळांमुळे विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिक व्यायाम होत नाही, तर एकाग्रता, समन्वय, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि संघभावना यांसारख्या गुणांचाही विकास होत आहे. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्यही या उपक्रमातून साध्य होत आहे.
विशेष म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल साधनांपासून दूर राहत विद्यार्थ्यांनी मैदानात खेळण्याचा आनंद घेतला. त्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण असून शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर आणि संचिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आनंदी वातावरणामुळे घारपी शाळेचा हा उन्हाळी छंद वर्ग खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरत आहे.

“आजची मुले मोबाईल आणि डिजिटल माध्यमांकडे अधिक आकर्षित होत असताना त्यांना आपल्या पारंपरिक खेळांची ओळख करून देणे काळाची गरज आहे. खेळातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडतो. उन्हाळी छंद वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला असून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खेळ जपण्याचा हा प्रयत्न आहे.”
— जे. डी. पाटील, मुख्याध्यापक

प्रतिक्रिया व्यक्त करा