सर्व बाजारपेठांत सीसीटीव्ही कॅमेरे; कचरामुक्त जिल्ह्यासाठी कचराकुंड्या उभारणार, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
कणकवली :
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून कचरामुक्त जिल्ह्यासाठी सर्व शहरांमध्ये कचराकुंड्या उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा व्यापारी पदाधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आभार मानण्यात आले. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील ‘ओम गणेश’ या निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी प्रदीर्घ चर्चा केली.
ओसरगाव येथील टोलमधून सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना वगळण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर व्यापारी महासंघाच्या कार्यालयासाठी भूखंड देण्याचेही आश्वासन देण्यात आले. कचरामुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हा नियोजनातून सर्व बाजारपेठांसाठी कचराकुंड्या देण्यात येणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. परप्रांतीय व्यापारी रोखण्यासाठी फिरत्या व्यापार्यांना महासंघामार्फत ओळखपत्रे देण्याची सूचना करण्यात आली.
जिल्ह्यातील व्यापार-उद्योग वाढीसाठी सकारात्मक चर्चा झाली असून दर तीन महिन्यांनी महासंघाच्या कार्यकारिणीसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, कार्यवाह राजू जठार, माजी अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, सहकार्यवाह राजन नाईक, उपाध्यक्ष भोगले साहेब, उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, उपाध्यक्ष पुंडलीक दळवी, कुडाळ तालुका अध्यक्ष पी. डी. शिरसाट, सावंतवाडी तालुका अध्यक्ष जगदीश मांजरेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, प्रकाश वाळके, हर्षल बांदेकर, राजेंद्र पिसे आदी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
