फोंडाघाटात अवजड वाहतुकीवर बंदीचा निर्णय; पर्यायी मार्गाची आखणी
पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक; व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाऊल
फोंडाघाट
फोंडाघाट येथे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अवजड वाहतूक बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तरळे–वैभववाडी–गगनबावडा मार्गे कोल्हापूरकडे वाहतूक वळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
ही बैठक पोलीस निरीक्षक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक मुल्ला, महामार्ग पोलीस निरीक्षक राठोड, ठेकेदार ए. पी. सावंत, संदेश अबिटकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राजन चिके, नकाशे चिरे वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोठ्या ट्रक वाहतुकीमुळे बाजारपेठेत होणारी कोंडी व व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचे नमूद केले.
