You are currently viewing वेंगुर्ले मठकरवाडी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वेंगुर्ले मठकरवाडी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वेंगुर्ले मठकरवाडी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ओल्या रस्त्यामुळे गाडी घसरली; चारचाकीला धडक, २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

वेंगुर्ले :

वेंगुर्ले मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले, देवगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ता ओला झाल्याने दुचाकी घसरून हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला–सावंतवाडी मुख्य मार्गावर हा अपघात घडला. शुभम गुरव हा वेंगुर्ले येथून आपल्या दुचाकीने देवगडकडे जात असताना मठ परिसरात त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला. ओल्या रस्त्यामुळे गाडी घसरून समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला धडकली. या भीषण धडकेत तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत रुग्णवाहिकेद्वारे त्याला वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वेळी मठ येथील भाजपा पदाधिकारी अजित नाईक, ग्रामपंचायत सदस्य शमिका मठकर, संतोष नांदोस्कर, रोहित बोवलेकर, रघुवीर बोवलेकर, संतोष तळवडेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य केले. रुग्णवाहिका चालक रमेश टेमकर आणि डॉ. मुंढे यांनी तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.
अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा