मोरगाव दलित वस्तीत संघर्षाला यश; १४ सौर पथदिवे अखेर बसवले
ठिय्या आंदोलन व घेरावानंतर प्रशासन झुकले; “हक्कासाठी एकजूटच ठरली निर्णायक”
दोडामार्ग :
मोरगाव येथील दलित वस्तीतील ग्रामस्थांच्या प्रखर आणि एकजूट संघर्षानंतर, अखेर वस्तीत १४ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मोरगाव दलित वस्तीसाठी हे १४ सौर पथदीप मंजूर करण्यात आले होते. मात्र, काम सुरू झाल्यानंतर सरपंच संतोष आईर यांनी हे पथदिवे दलित वस्तीत न बसवता गावठाण व बागवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचे निर्देश दिल्याने वाद निर्माण झाला.
आपल्या हक्काच्या सुविधेवर अन्याय होत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ आक्रमक झाले. “मंजूर निधी वस्तीचा असताना दिवे बाहेर का?” असा सवाल करत त्यांनी काम रोखून धरले. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत गटविकास अधिकारी व सरपंचांना घेराव घातला तसेच ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. सर्व दिवे वस्तीत बसविल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती.
ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने १० एप्रिलपूर्वी सर्व पथदिवे वस्तीत बसविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार आता सर्व १४ सौर पथदिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
“हा केवळ पथदिव्यांचा प्रश्न नव्हता, तर आमच्या हक्काचा होता. संघटित शक्तीमुळेच आज आमची वस्ती प्रकाशमय झाली आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
