You are currently viewing सर्वांग सुंदर विचारांचा दीपस्तंभ – जिद्दी सचिन कमल गणपतराव मुळे
Oplus_16908288

सर्वांग सुंदर विचारांचा दीपस्तंभ – जिद्दी सचिन कमल गणपतराव मुळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित भावस्पर्शी लेख*

 

*सर्वांग सुंदर विचारांचा दीपस्तंभ – जिद्दी सचिन कमल गणपतराव मुळे*

 

जग हे सुख-दुःखाच्या नाजूक रेशीमधाग्यांनी विणलेले वस्त्र आहे, असे म्हटले जाते. दिव्यांग असूनही सर्वसाधारण जीवन जगण्याचा निरपेक्ष प्रयत्न करणाऱ्यांना केवळ “दिव्यांग” ही उपमा पुरेशी नाही; ते खरे तर सर्वांगसुंदर विचारवंत असतात, असे माझे ठाम मत आहे. हे तुम्हालाही पटावे म्हणून अशाच एका सर्वांगसुंदर विचार करणाऱ्या खऱ्या जीवन नायकाची गोष्ट वाचायलाच हवी.

 

त्याचे नाव आहे “सचिन कमल गणपतराव मुळे.” त्याच्या नावावरूनच त्याच्या प्रगल्भ विचारांची ओळख पटते. आपले नाव लिहिताना वडिलांसोबतच आयुष्य घडविण्यात तितकाच वाटा असलेल्या आईलाही तो विसरत नाही, ही बाब विशेष भावते.

 

सचिनचा जन्म परभणी जिल्ह्यातील शेळकेवाडी या गावात झाला. त्यांचे कुटुंब परभणीत स्थायिक असून येथे त्यांचे स्वतःचे घर आहे. वडील शिवणकामाचा व्यवसाय करतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाजगी नोकरीही करतात. आईदेखील शिवणकामात हातभार लावते.

 

सचिनला एक मोठा आणि एक लहान भाऊ, तसेच एक बहीण आहे. भावंडांमध्ये अतूट प्रेम आहे. सचिन वगळता इतर सर्वांचे विवाह झालेले आहेत. मोठा भाऊ सरकारी नोकरीत, तर लहान भाऊ खाजगी नोकरीत कार्यरत आहे.

 

सचिनच्या जन्माने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते; परंतु नियतीला हे सुख बहुधा मान्य नव्हते. तो सहा महिन्यांचा असताना अचानक ताप आला. तापाचे कारण समजत नव्हते. उपचार सुरू झाले; परंतु औषधांचा विपरीत परिणाम होऊन त्याची प्रकृती अधिकच बिघडली. डॉक्टरांनीही आशा सोडल्यासारखे स्पष्ट केले. त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाले. देवाने त्याच्याकडून चालण्याची हलण्याची सुमारे ८० टक्के क्षमता घेतली.

 

या अवस्थेत आईचे मन काय सहन करत असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आईने नवस केले, देवाला प्रार्थना केली. पूर्णपणे परावलंबी झालेला सचिन हळूहळू मोठा झाला. इतर मुलांप्रमाणे आपणही शाळेत जावे, असे त्याला वाटत असे. त्याचा हट्ट पाहून शेवटी आईने एका दिव्यांग शाळेत त्याचे नाव टाकले. या शाळेत त्याने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी अशी दिव्यांग शाळा नसल्याने त्याला इच्छा असूनही शिक्षण सोडावे लागले.

 

वय वाढत गेले तसे त्याची शारीरिक मर्यादा अधिक जाणवू लागली. ज्या वयात मुले खेळतात, धिंगामस्ती करतात, त्या वयात सचिनची लढाई नशिबाशी सुरू होती. “आहे ते आहे” हे सत्य स्वीकारून त्याने पुढे जाण्याचा मार्ग निवडला.

 

शारीरिक मर्यादा असल्या तरी त्याची बुद्धी अत्यंत तेजस्वी आहे. वाचनाची प्रचंड आवड असूनही पुस्तक हातात धरणेही कठीण असताना त्याने अडचणींवर मात करत वाचन लेखन सुरू ठेवले. कवितेच्या गोडीमुळे त्याने अनेक साहित्य समूहांमध्ये भाग घेतला आणि पुरस्कारही मिळवले.

 

अभंग, चारोळी, कविता आणि कथालेखनात त्याने प्रथम क्रमांक पटकावले आहेत. २०२३ साली महाराष्ट्र साहित्यदर्पण आयोजित राज्यस्तरीय संमेलनात “महाराष्ट्र आयकॉन” पुरस्कार, तर २०२४ मध्ये राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे तर्फे “बंधुता शब्दक्रांती” पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी मराठबोली, पुणे यांच्या वर्धापन दिनानिमित्त “लोकसाहित्यिक” पुरस्कारानेही त्याचा गौरव झाला.

 

त्याचे लेख, कथा आणि कविता विविध वृत्तपत्रांत प्रकाशित होतात. स्वतः लेखन करण्याबरोबरच इतरांच्या लेखनाला प्रोत्साहन देणे हा त्याचा छंद आहे. त्याचे अभिप्राय वाचणे अनेकांना आवडते. त्याला बुद्धिबळ या खेळाचीही आवड आहे.

 

सचिन ८० टक्के दिव्यांग आहे पण त्याचे विचार नेहमी सकारात्मक असतात. देवाने २० टक्के शारीरिक क्षमता दिली आहे, याबद्दल तो नेहमी देवाचे आभार मानतो. हे २० टक्के त्याला २०० टक्क्यांपेक्षा जास्त मोलाचे वाटतात. धडधाकट व्यक्तीसुद्धा कुरकुर करत असतात; पण सचिनजवळ दुःखाचा चष्मा नाही. “जीवन सुंदर आहे; अडचणी येतात, पण त्यातून मार्ग काढायचाच,” हा त्याचा दृष्टिकोन आहे. माणसाने समाधानी असावे; हे समाधान दैवी शक्तीमुळेच मिळते, असा त्याचा विश्वास आहे. त्याच्या विचारसरणीपुढे कुणीही भावनाशील व्यक्ती नतमस्तक व्हावी, अशी त्याची योग्यता आहे.

 

देवाने अन्याय केला, अशी तक्रार तो कधी करत नाही. “आहे ते आहे” ही त्याची स्वीकाराची वृत्ती त्याला नेहमी उभारी देते. शारीरिक मर्यादा म्हणजे अपूर्णता नाही, हे त्याचे जीवन पाहिले की सहज लक्षात येते. दिव्यांग असला तरी त्याचे विचारविश्व अफाट आहे. विचारांची स्पष्टता ही त्याला मिळालेली दैवी देणगी आहे.

 

सरकारी नोकरी फक्त ४०% दिव्यांगत्व असलेल्यांनाच मिळते. त्यामुळे सचिनने परभणीतील आपल्या घरातच छोटेसे दुकान सुरू केले. आई वडिलांच्या मदतीने तो दिवसभर कामात गुंतलेला असतो. कुटुंबावर भार नको, ही त्याची भूमिका मनाला स्पर्शून जाते.

 

५० रुपयांपासून सुरू केलेल्या या दुकानात आता झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, प्रिंटर, लॅपटॉप आहेत. मोबाईल रिचार्ज सेवा देखील उपलब्ध आहे. कमाई खूप नाही; पण स्वकमाईचे समाधान आहे. सरकारी मदत अत्यल्प आहे. अशा व्यक्तींना सरकारकडून अधिक मदतीची गरज आहे, हे स्पष्टपणे जाणवते.

 

कधीकधी निराशा येते “माझ्याच वाट्याला हे दुःख का?” असा प्रश्न पडतो; पण तो पुन्हा सावरतो, कामात रमतो, लेखन करतो, मित्रांशी बोलतो. विशेष म्हणजे त्याला कोणतेही व्यसन नाही.

 

प्रत्येक माणसाप्रमाणे त्यालाही जीवनसाथीची इच्छा आहे. दया नव्हे, तर समजून घेणारा साथीदार मिळावा, अशी त्याची अपेक्षा आहे. योग्य व्यक्ती नक्कीच मिळेल, हा त्याचा विश्वास मनाला भावतो. देवावर असलेली श्रद्धा आणि स्वकर्तृत्वावर विश्वास हे त्याचे खास गुण आहेत.

 

अशा जिद्दी, सकारात्मक आणि स्वाभिमानी सचिनच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

प्रतिभा पिटके, अमरावती

मो. ९४२१८२८४१३

प्रतिक्रिया व्यक्त करा