You are currently viewing हो ऐसी अक्षरे रसिके

हो ऐसी अक्षरे रसिके

*श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री करुणा शिंदे लिखित अप्रतिम ललितलेख*

 

*हो ऐसी अक्षरे रसिके*

 

 

“शब्द होती सागर, शब्द नेई भवपार,

शब्दांमुळे होतो भावनांचा बाजार.

शब्दांचा वणवा, शब्दानेचं शमणार,

शब्दांची तहान शब्दानेच भागणार.”

 

*मराठी साहित्य आणि संस्कृतीत शब्दांना ‘ब्रह्म’ मानले गेले आहे, जे भावविश्व उलगडतात मनातले*

 

शब्द हे मनातील भावना, प्रेम, वेदना, आणि आठवणींना वाट मोकळी करून देतात, ज्यामुळे अंतःकरणातील भावनांचा अथांग सागर उमटतो. यातूनच काव्य,… शायरी आणि सुरांचा मेळ साधणारी कलाकृती जन्म घेते…तेव्हा नव्या विचारांची वाट मोकळी होत जाते….

 

हो..आहेतच मुळी..

सारी रसिकता शब्दात लपलेली ..म्हणून तर लेखणी उचलली की विचारांचे तरंग उमटले जातात. व अगदीं मनाला मोहून टाकणारे शब्द मनातले नकळत लिहिले जातात..

मनातील भावना साकारणारा हा सर्वात मोठा दागिना आहे..जो मनातील विचारांना नवसवाष्णीचे रुप बहाल करतो..अगदी हिरव्या पाचूत गुंफून नववधूच्या रूपात निसर्गाच्या सोबतीने .. बकुळीचा सुगंध पेरत अलवार मनात भरून जाणारी अक्षर ..आपल्या मनाच्या गाभाऱ्यात विसावतात. अगदी आपल्या सख्या सारखी..

त्यांना आठवताना ओठाची लाली अधिकच खुलते.. तन मनातुन अगदी रोमांचून जातात..ऐन तारुण्यात प्रवेश केलेल्या तरुणी सारखे अगदी लाजून चूर होतात…जणू काय नुकतीच न्हाणी घरातून आलेली ..मोकळ्या केसांचा अंबाडा बांधणारी ती नवशब्दात प्रसवते..किती अनोखे विश्व असते.सुंदर. अक्षरांचे..

 

मनातील भावना गुंतत जातात हृदयाचा ठाव घेणारी..

अक्षरं न अक्षर पुन्हा

गिरवताना शब्दांच्या पलीकडले गूज अंतरीचे आठवते..किती सहज सुचलं म्हणून… स्वतःची पाठ थोपटून घेत… प्राजक्ताचा परिमल खुलवते…

मी माझी कधी रीती होते..अगदीं आठवणीचे गाठोडे उघडून.. शब्दा शब्दातून माझे मन एकांतात हरवून जाते..आपल्याच विश्वात मग्न होऊन…झालेल्या सर्व गोष्टी आठवत…कधी आनंदाचे तर कधी पापणी ओली करणारे शब्द नकळत लिहिले जातात..

हा अक्षरांचा नाद हळू हळू मनात रुंजी घालू लागतो…अगदीं नवयुवती प्रमाणे…काय घालू नका नको..अगदी आरश्यात पहाताना जशी मानेला झटका देते.केसांची बट हळूच कपाळावर ओढून…आपल्याच ओठांनी अलगद फुंकर घालून..तीला आपल्या मनात भरून जाते..अगदीं तसेच असते..या अक्षरांचे..गोल गिरकी घेऊन..आपल्याच पायावर उभे करण्याचे धाडस भरतात…

कधी सखा कधी प्राणसखा बनून माझ्याशी सलगी करू लागतात…कधी आपल्या मिठीत सामावून घेतात..तर कधी वाऱ्याची झुळूक होऊन हळुवार स्पर्श करून जातात..त्याच्या मृदू मुलायम .चाफ्याचा सुगंध देत सर्वत्र पसरून काजवे चमकावे.तसे चमकून जातात.. नयनांच्या काजळरेषेत सौंदर्याचं रुप देखणे.. डोळा भरताना..समुद्र किनारी… पदराला खेटणारा वारा होऊन मनाच्या सोबत गप्पांची मैफिल सजवतात ..

केव्हा केव्हा आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलणारे अक्षर फुलांच्या रांगोळ्या काढून विवध रंगाचा फुलोरा होऊन जातात..तर डोळ्याची पापणकडा ओलवते.. व मन नकळत माहेरच्या अंगणात..वडाच्या पारंब्यावर झूलताना दिसते.. आईच्या अंगणातील पवित्र तुळस..माझे सौभाग्य अखंड रहावे म्हणून..दिव्याची ज्योत प्रज्वलित होते…प्रकाशाच्या दिशेने पावले वाटचाल करतात…खरचं शब्दांचे मोती..अलगद एक एक करून विणले जातात..अगदीं कधी न सुटणाऱ्या पवित्र संस्कारात…आजीच्या मायेचा ओलावा आठवून मन नकळत मुक्त फुलपाखरासारखे या फुलावर त्या फुलावर उडताना ..आपले वय विसरून जाते…हे सारे शब्दांचे आयुष्य माझ्या ओंजळीत भरून गेले आहे..कधी माझी सखी,कधी सखा,तर कधी वाऱ्याची हळुवार स्पर्शात रंगवून जाते..

खरच…आता तूच सांग रे शब्दा.. अक्षरा.. तू किती रसिक आहेस..कायम माझ्या मनात भरून राहिलेला..माझ्या प्रत्येक वळणावर मला साथ देऊन आपलस करणारा..म्हणूनच तर आज प्रत्येक प्रसंगात..मी कधी एकटी पडली नाही.. तुझ्या मुळे आज क्षितिजापर्यंत मनाला घेऊन जाते..अशीच पुढेही तुझ्या सोबतीने..शेवटच्या श्वासापर्यंत चालता जाणार..अविरत न थकता…वेगवेगळ्या अलंकारात गुंफून येणार.

घुंगराच्या प्रत्येक ठोक्यावर…जीवाची तगमग करणारा…त्याच्या नादात..हळुवार फुलत जाणारी अक्षरांची लेणी..ढोलकीच्या तालावर पाय थिरकु लागले…अलवार मनात भरून जतात…ही अक्षरांची जादू…जगण्याचे बळ एकवटून लेखणीत उतरते…

 

*अक्षरांची ही खरी जादू*

*मनाला घालते मोहिनी*

*त्यांच्या सोबतीने फिरताना*

*कायमची होते ती अर्धांगिनी*

 

*करूणा शिंदे पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा