भाजी मार्केटसमोरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश; मालवण नगरपरिषदेकडून नोटीस
रस्ता व गटाराची हद्द दाखवून स्टॉल मागे घेण्याच्या सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा
मालवण
मालवण नगरपरिषद भाजी मार्केट इमारतीसमोर भाजीपाला स्टॉल लावणाऱ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशा नोटिसा मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
दरम्यान, रचना सहाय्यक स्नेहल पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन रस्ता व बंदिस्त गटाराची हद्द दाखवून दिली. स्टॉल गटाराच्या आतमध्ये हलवावेत आणि रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशा सक्त सूचना त्यांनी व्यावसायिकांना केल्या.
नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भाजी मार्केटसमोरील रस्त्यावर स्टॉल लावल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी आपले स्टॉल तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा नियमानुसार प्रशासकीय कारवाई करून स्टॉल उचलण्यात येतील.
नोटीस मिळाल्यानंतर व्यावसायिकांनी स्टॉल मागे घेण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यापुढे कोणतेही अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक ललित चव्हाण, शेखर गाड आदी उपस्थित होते.
