तिरोडा येथे पुरातन तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण; ५० लाखांच्या कामामुळे गावाच्या सौंदर्यात भर
सावंतवाडी
तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिरासमोरील पुरातन तलावाच्या सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र भोसले, सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, तिरोडा ग्रामविकास मंडळ (मुंबई) अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर, माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे, विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभारंभाच्या वेळी देवी माऊली मंदिरात श्रीफळ ठेवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर प्रवीण भोसले यांच्या हस्ते तलावात श्रीफळ अर्पण करून कामाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
तिरोडा येथील हा तलाव अत्यंत पुरातन असून त्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे आवश्यक होते. या कामासाठी माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री प्रवीण भोसले, मा. आमदार शाम सावंत, सुरेंद्र भोसले, नामदेव केरकर, उमेश सावंत व विश्वनाथ आडारकर यांनी निधी मंजुरीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
सुमारे ५० लाख रुपयांच्या या कामामुळे तलावाच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या कामाच्या शुभारंभामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमावेळी तिरोडा ग्रामविकास मंडळाचे सदस्य तसेच सत्यवान आडारकर, शरद गोडकर, विलास सावंत, महेश्वर केरकर, पंढरी सावंत, रघुनाथ आडारकर, गंगाराम केरकर, काशिनाथ गोडकर, बाबल शेणई, काशिनाथ तिरोडकर, उत्तम गावडे, अनिल केरकर, ठेकेदार मच्छिंद्र तांडेल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
