You are currently viewing इराण अमेरिका युद्ध— तुमचे मत

इराण अमेरिका युद्ध— तुमचे मत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*इराण अमेरिका युद्ध— तुमचे मत*

 

. वास्तविक मानवी जीवनाचा इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धानेच भरलेला आहे. स्वातंत्र्ययुद्धे, क्रांती युद्धे, सत्तायुद्धे, धार्मिक जातीय युद्धे- थोडक्यात नाना प्रकारची युद्धेच आणि पुन्हा पुन्हा जेव्हाही या युद्धांचा आढावा घेतला जातो तेव्हा फक्त एकच लक्षात येते की युद्ध म्हणजे केवळ मानवी संहार आणि संहारच. युद्धात हरलेले ही शूर असतात आणि जिंकलेले ही शूर असतात पण प्रत्यक्ष समर भूमीवर या शौर्याची किंमत मोजताना समोर येतो तो फक्त मृत्यूचाच थयथयाट.

दुष्ट शक्तींचा संहार करण्यासाठी युद्धं करावीच लागतात. देव आणि दानवातही युद्धं झाली. अधर्म, अनीती, अत्याचार भडकला तर त्याला संपवण्यासाठी युद्धं करावीच लागतात. राम रावण युद्ध किंवा कुरुक्षेत्रा वरील पांडव कौरवांची लढाई याच कारणास्तव झाली. श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी शिवरायालाही लढावे लागले पण या लढाया FORGIVE THE SINNER NOT THE SIN या तत्त्वांवर आधारलेल्या होत्या. यात दुर्गुणांचा विनाश आणि सदगुणांचा विजय होता पण ज्यावेळी सत्तांधता, श्रेष्ठत्वाची भावना,’ मी करेन तोच कायदा’, शारीरिक, आर्थिक, तांत्रिक बळांचा झालेला गर्व ‘सारं जग माझ्याच मुठीत’ या भावनेतून जी अत्यंत असमंजस, निर्दयी, बेधुंद, बेचछूट युद्धे घडतात ती कुणासाठी फायद्याची नसतात. मूळात या युद्धामागच्या भूमिकाच स्वार्थ, हव्यास याने बरबटलेल्या असतात आणि अशा युद्धाचे साऱ्या विश्वावर जे पडसाद उमटतात ते विनाशकारी असतात.

 

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सध्या चालू असलेलं हे भीषण युद्ध म्हणजे केवळ मानवतेला, विश्वबंधुत्वाला काळीमा फासणारं आहे. जगाच्या इतिहासात जे जे महात्मे होऊन गेले त्यांनी मानव जातीला ‘दया क्षमा शांती’चाच संदेश दिलाय.

*अहिंसा परमोधर्म* हेच विश्वाचं कल्याणकारी एकमेव तत्व आहे. या युद्धांनी मात्र ही सारी गुणवंत वचने आणि तत्वे पायदळी तुडवली आहेत.’बळी तो कान पिळी’ हा जंगलचा कायदा आहे. मानवी जीवनात जेव्हा या कायद्याचा वापर केलेला दिसतो तेव्हा माणूसही हिंस्र पशु सारखाच भासतो आणि ज्या ज्या लढायांमध्ये ही मानसिकता होती त्यात युद्ध पुकारणार्‍यांना अंतिम नामुष्कीच पत्करावी लागली आहे.

 

सत्तेच्या प्रचंड महत्वकांक्षेपायी नेपोलियन असो हिटलर असो, हिरोशिमा नागासाकी वरचे बॉम्ब हल्ले असोत व्हिएटनामचे युद्ध असो सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना माघारच घ्यावी लागली आहे पण तोपर्यंत झालेला संहार, सामान्य निरपराध जीवांना भोगावे लागणारी दुःख, झालेल्या प्रचंड सार्वजनिक संपत्तीची नुकसान भरपाई कशी करणार?

 

‘हम करे सो कायदा’ या भूमिकेतून अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या अध्यक्षाने माथेफिरू निर्णय घेतला आणि इस्त्रायलच्या मध्यस्थीने इराण सारख्या तुलनेने अक्षम परंतु भौगोलिक आणि नैसर्गिक स्त्रोतांमुळे उजवा असलेला आणि तंत्रज्ञानाच्या आधारे जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त करू पाहणाऱ्या देशावर निर्बंध आणि अटी घालून अधुनिक समर्थ शस्त्रांद्वारे नेस्तनाबूत करण्याचा डाव अमेरिकेने मांडला आणि या डावात आपण जिंकणारच, इराण अल्पावधीतच शरणागती पत्करेल, युद्ध समाप्ती लवकरच होईल आणि जगातले आपले बलशालीपण पुन्हा एकदा सिद्ध होईल या अहंमन्यतेला आणि मूर्खतेला इराणने दिलेला अत्यंत पराक्रमी,धाडसी आणि आत्मविश्वासाचा शह, तसेच देशाचा नेता गमावल्यामुळे निर्माण झालेली सूड भावना संपूर्ण जगाला थक्क करून गेली आहे. नव्हे या युद्धामुळे साऱ्या जगाला इराणनेच हादरवून टाकले आहे.

 

इराणने ‘होर्मुझची’ समुद्रधुनी बंद करून जगातली तेलाची आयात निर्यातच रोखली. मुबलक किंवा पुरेसा तेलसाठा हे सर्वच राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे शस्त्र आहे. इराणने उचललेल्या या निर्भय पावलामुळे समस्त जगातले शेअर बाजार धडाधड कोसळले. जागतिक व्यापाराची गणितं विस्कटली. तेल टंचाईच्या प्रवाहात महागाईचा राक्षस विकट होत आहे.’ कथा कुणाची व्यथा कोणाला’ किंवा ‘कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर’ अशी आज आखाती देशांचीच नव्हे तर जगभराची स्थिती झालेली आहे.

अशावेळी,

“ सिकंदर ने पोरससे की थी लडायी

जो की थी लढायी तो मै क्या करू?” असे म्हणून शांततेने हा युद्धाचा तमाशा बघत राहणे हे शहाणपणाचे कसे ठरेल?

 

आता झालंय काय नाक मुठीत घेऊन माघार घेताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी नामुष्कीचे तर आहेच म्हणून त्यांच्या पोकळ युद्धगर्जना चालूच आहेत पण एकीकडे इराणची राष्ट्राविषयीची तीव्र प्रेमभावना उफाळून आल्यामुळे ते ‘बाहुबली’ सारखे नुसते सैराट झाले आहेत.

“तुम्ही असं कराल तर आम्ही असं करू” दहा अटींचा कणखर करारनामा त्यांनी अमेरिकेच्या तोंडावर फेकलाय. सारं जग आता युद्ध संपेल,संपलय, चर्चा यशस्वी होणार, शस्त्र संधी झालाय अशा आशावादात असतानाही युद्ध मात्र तितक्याच प्रखरतेने अजूनही चालूच आहे ही वस्तुस्थिती आहे. या युद्धजन्य परिस्थितीत शांतता आणि परस्परांचा विकास साधण्यासाठी निर्माण झालेल्या युनो, नाटो, ब्रिस्क सारख्या जागतिक संस्थांचंही अस्तित्व आता डळमळीत झालेलं आहे.

 

या युद्धबंदीसाठी कोणत्या राष्ट्राने कसा पुढाकार घ्यायला हवा, पाकिस्तानने केलेली मध्यस्थी, यातून भारताला बसलेली चपराक, चीनची धूर्त लुडबुड या सगळ्या घटना नेमक्या कशासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी हे मात्र अनाकलनीय आहे.त्यात पुन्हा भविष्यात उद्भवणार्‍या युद्धांचीच चिंता जाणवते आणि त्यावर नेमकं मत देणं हे बौद्धिक शक्तीच्या पलीकडे आहे. तूर्तास इतकंच वाटतं हा मानवी संहार, हा विनाश थांबावा. लढाई कुणाच्याच भल्याची नाही. जागतिक अशांतता आणि असुरक्षितता माजवणारी आणि उद्याच्या निरपराध पिढीच्या भविष्यासाठी हानिकारक आहे हे मात्र नि:संशय!

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा