कुडाळ येथे महालक्ष्मी हॉलमध्ये भव्य आयोजन; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
केवळ निर्गुण ओपन गटात प्रथम, मिनल सुलेभावी १९ वर्षाखालील गटात अव्वल; विजेत्यांसह उत्तेजनार्थ स्पर्धकांचाही गौरव; रोख बक्षिसे, चषक व मेडल प्रदान
कुडाळ :
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित ‘खासदार चषक २०२६ बुद्धिबळ स्पर्धा’ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये उत्साहात व मोठ्या प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत ओपन गट आणि १९ वर्षाखालील गट अशा दोन विभागात स्पर्धा भरवण्यात आली.
स्पर्धेत ओपन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत केवळ निर्गुण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मयुरेश देसाई यांनी द्वितीय क्रमांक, तर अस्मी तेरसे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. बालकृष्ण पेडणेकर यांनी चतुर्थ क्रमांक, तर आयुष रायकर यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
१९ वर्षाखालील गटात मिनल सुलेभावी यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले. वरद राजेंद्र तवटे यांनी द्वितीय क्रमांक, तर यथार्थ डांगी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. आदित्य सकपाळ यांनी चतुर्थ क्रमांक आणि विभव राऊळ यांनी पाचवा क्रमांक मिळवला.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाला चालना मिळाली असून, युवा व अनुभवी खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.
या स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, उपस्थितांनी स्पर्धेचे कौतुक केले.
