सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी उदार देणग्यांचा ओघ
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून २५ हजार, तर सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम धुरी यांच्याकडून १० हजारांची मदत
सावंतवाडी
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. कोकण कला व शिक्षण विकास संस्था तसेच दात्यांकडून मिळालेल्या देणग्यांमुळे संस्थेच्या सेवाभावी कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
आपल्या सामाजिक सेवेच्या कार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले मा. दयानंद कुबल (मुंबई) यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेत आपल्या “कोकण कला व शिक्षण विकास संस्था”तर्फे रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपयांची देणगी दिली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व रोजगार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून निराधारांना आधार देणे, आश्रमांना मदत करणे असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. त्यांच्या या कार्याची राज्यभर दखल घेतली जात असून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने मा. दयानंद कुबल यांना आभारपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम गणेश धुरी यांनीही संस्थेच्या सेवाभावी कार्याची दखल घेत १० हजार रुपयांची देणगी दिली.
या सर्व दात्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर तसेच उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सदस्य रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.
