*ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके यांच्या ‘गेले द्यायचे राहून’ या काव्यसंग्रहाचा डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी दिलेला परिचय…*
*काव्यसंग्रह: गेले द्यायचे राहून*
🖊️प्रज्ञा घोडके, चिंचवड
#प्रकाशक: परीस पब्लिकेशन, पुणे
#किंमत: ₹.२००/-
Gpay/Cont.+91 96045 57689
द्वैत-अद्वैताच्या येरझाऱ्या…!!
“गेले द्यायचे राहुनी” हे आरती प्रभूंच्या कवितेतील म्हणणे फार सूचक आहे. या तीन शब्दात साफल्य आणि अपूर्णता या काहीशा विरुद्ध भावनांचा संगम झालेला दिसून येतो. गेले द्यायचे राहुनी मध्ये काहीतरी देण्याची अपूर्णता जशी हुरहूर लावणारी आहे, काहीशी वेदना देणारी आहे त्याचप्रमाणे देण्याची वृत्ती असणे हे मानसिक पातळीवर प्रगल्भ झाल्याचा, साफल्य बहाल करण्याचा क्षण आहे. याच वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारा, लवकरच प्रकाशित होणारा कवितासंग्रह म्हणजे कवयित्री प्रज्ञा घोडके यांचा “गेले द्यायचे राहुनी” हा होय.
आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर काही प्रगल्भ मनाच्या मागण्या संपत जातात. अपेक्षांची ओझी खाली ठेवली जातात. आपल्याकडे जे हे ते देण्याकडे कल वाढत जातो. त्यातून लाभणारे समाधान वेगवेगळ्या प्रतिमांमधून व्यक्त केले जाते.
*हिमालय साक्षी आहे*
*आयुष्याच्या प्रवासाचा*
*शांत संयमी पुरावा*
*जीवनाच्या प्रवाहाचा*
या आणि अशा ओळींमधून या मानसिकतेची प्रचिती आपल्याला येत जाते. स्थिर, अविचल असा हा निसर्ग आतल्या भावभावनांचा, त्यात झालेल्या स्थित्यंतरांचा साक्षीदार आहे ही जाणीव मनाला एक वेगळी ऊर्जा देते. मग हे सगळे शब्दांमधून मांडण्याची धडपड सुरू होते. काही काळ गेल्यानंतर त्यापुढची अवस्था येते. या निसर्गाशी असलेले द्वैत कधीतरी संपून जाते आणि आपणच निसर्ग आहोत ही जाणीव अद्वैताचे काही तृप्त क्षण बहाल करायला लागते. ही अनुभूती शब्दांमधून मांडणे निव्वळ अशक्य वाटायला लागते. शब्द संपल्यावर जे शिल्लक उरते ते म्हणजे ही जाणीव असते. मग नकळत कवयित्री लिहून जाते.
*आता शब्दही संपून*
*मुकी अबोल मी झाले*
*हळूहळू निःशब्दात*
*मौन बहरून आले*
हे मौन बहरून आल्यानंतर सगळ्या तक्रारी संपून जातात. या मौनात खोलवर उतरत जात असताना
मनदीप उजळत जातात, ज्ञानेशाची ओवी प्राण वाटायला लागते, कर्तव्याचे जीवनार्थ उलगडायला लागतात. मनक्षितिजे झुलायला लागतात आणि या अनवट वाटेवरचा प्रवास अधोरेखित करण्यासाठी पुन्हा शब्दांचा आधार घ्यावासा वाटायला लागतो. इथेच मग द्वैत-अद्वैताच्या येरझाऱ्या सुरू होतात. मग कितीही दिले तरीही ते कमीच वाटायला लागते. शब्दातून कितीही मांडले तरीही आत तेवढेच शेष उरलेले असते. तो अपूर्णतेचा चटका जीवाला डागत राहतो आणि मग लिहिले जाते,
*गाणे ओठात राहिले*
*गेले गायचे राहून*
*देणे तुझेच जन्माचे*
*गेले द्यायचे राहून*
या कवितासंग्रहातील कविता मानवी जगण्याचे नेमके मर्म उलगडून दाखवत राहतात. अनेक प्रतिमा-प्रतिकांमधून जगण्याचा संस्कारशील मार्ग सांगत राहतात. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू विकसित होत असताना प्रेमाचे, आपलेपणाचे बंध किती चिवट आहेत हे स्पष्ट करत असताना या नात्यांमध्ये देत राहिले तर जगणे कसे परिपूर्ण भासते हे व्यक्त केलेले आहेच, पण ही देण्याची भावना मनात कशी रुजली, कशी उमलून आली यामागे असलेला अध्यात्माचा भक्कम आधारदेखील अधोरेखित केला जातो.
एकूणच, जगत असताना कितीही वेदना, दुःख वाट्याला आली तरी त्याचे अवडंबर न माजवता एक शांत, सुखमय आयुष्य जर जगायचे असेल तर देण्याची भावना वाढीला लागायला हवी हे सार हा संग्रह आपल्याला देतो. तसेच ही देण्याची भावना विकसित करण्यासाठी एक सकारात्मक आणि तत्वांचा पाया असलेली जीवनदृष्टी आवश्यक आहे हे देखील अनेक कवितांमधून अधोरेखित होते.
वाचक या संग्रहाचे नक्की स्वागत करतील हा ठाम विश्वास आहे. कवयित्री प्रज्ञा घोडके यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील साहित्यिक प्रवासास शुभेच्छा देऊन थांबते.
डॉ. नयनचंद्र सरस्वते,
पुणे
