अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी; राज्यभरातील मान्यवरांचा सहभाग
कणकवली / प्रतिनिधी :
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात राणे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच विकासात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी समितीकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून, हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक लक्षवेधी ठरणार आहे.
