किनारपट्टी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर; गस्ती नौका खरेदीलाही गती देण्याच्या सूचना
मुंबई (प्रतिनिधी):
अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा प्रभावी पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
महाराष्ट्र सागरी मासेमारी निर्मिती अधिनियम १९८१ च्या अंमलबजावणीसाठी गस्ती नौका व ड्रोन खरेदीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, सागरी सुरक्षेसाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे असून सध्या उपलब्ध ९ ड्रोनद्वारे हे काम सुरू आहे. आणखी १० ड्रोन खरेदी केल्यास सर्वेक्षण अधिक अचूक आणि प्रभावी होईल. त्यामुळे तातडीने प्रस्ताव तयार करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी गस्ती नौका खरेदी प्रक्रियेलाही गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
