*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*मीपण गळून जावे..*
त्यादिवशी ती मला सांगत होती, “मी आहे म्हणून यांचं बरं चाललंय. माझ्यामुळेच यांचं सारं सुरळीत चाललं आहे. संसाराचा रगाडा काही कमी असतो का? सगळं काही मी खांद्यावर पेलते म्हणून यांना कसली ददात नाही, तोशीश नाही. उद्या मी गेल्यावर यांचं कसं होईल गं? याची चिंता मला लागून राहिली आहे.”
थोडक्यात ‘मी मी आणि मीच’. माझ्या आधीही मीच,आताही मीच आणि नंतरही मीच. तिचं हे लांबलचक “मी पुराण” ऐकून मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं पण तिला काही समजूतीचं लवचिकतेचं, दूरस्थ,निवृत्त राहण्याबाबतीतलं काही सांगावं असंही मला वाटेना. कारण ती तिच्या ‘मीपणात’ इतकी डुबून गेली होती की माझं बोलणं तिनं माशी सारखं उडवून दिलं असतं. शेवटी मी तिला इतकंच म्हणाले, “खरोखरच तू सुपर वुमन आहेस.”
आमच्या सोसायटीतल्या मिसेस उदगावकर ही अशाच. तशा त्या देखण्या आहेत, त्यांची राहणी नीटनेटकी आहे, धनवानही आहेत, पारिवारिक आयुष्यात तशा सुखीच. रोज संध्याकाळी कट्ट्यावर येतातही पण बाईच्या चेहऱ्यावर अदृश्य अक्षरे लिहिलेली जाणवतात .”आय अॅम द बेस्ट!” माझ्यासारखी मीच. जे जे काही नंबर वन ते सगळं सगळं माझ्याकडे आहे.”
तशा बोलतात सगळ्यांशी पण चेहऱ्यावर असलेला कायमस्वरूपी, दुसऱ्यांच्या बाबतीतला तुच्छताभाव कधीही लपत नाही. ज्या दिवशी त्या कट्ट्यावर येत नाहीत तो दिवस भाग्याचाच असतो म्हणाना सगळ्यांसाठी.
“आज आल्या नाहीत का मिसेस “फुशारकी”? बरं झालं!” असं म्हणून कट्ट्यावर एक अत्यंत नैसर्गिक असा हशा पिकतो.
समोरचे नानाही त्याच पठडीतले आहेत.”आपलं बुवा असं आहे. भल्याभल्यांनी माझ्यापुढे नाकं घासली आहेत आता सांगा?”
पण नानांच्या बाबतीत एकदा कुणीतरी म्हणाले होते,” अहो! कोण विचारते या नानांना? निवृत्त झाले तेव्हा साधा निरोपसमारंभ ही कुणी आयोजित केला नाही यांच्यासाठी. एकही मित्र, स्नेही यांना नाही. पत्नी बिचारी त्यांचा हा अहंभाव, मीपणा नाईलाजाने सहन करते पण मुले कुठे विचारतात?”
थोडक्यात ही “मीपण” पांघरून वावरणारी माणसं असतात ना ती आपल्या पलीकडे काही जग आहे हे विसरूनच गेलेली असतात. अत्यंत अहमन्य आणि आत्मकेंद्री असतात ही.
मला आठवतंय एकदा मी माझ्या नातीने (वय वर्ष सात) काढलेलं एक सुंदर चित्र जवळच्या एका नातेवाईक स्त्रीला दाखवत होते. खरं म्हणजे तिने ते नीट पाहिलं सुद्धा नाही. कौतुक करणं तर दूरच राहो पण फाटकन म्हणाली,
“छेहो! हे तर काहीच नाही. माझ्या नातवाने केलेली पेंटिंग्ज तुला दाखवेन. रवी वर्माने पाहिली असती ना तर त्यानेही त्याचं कौतुक केलं असतं. आमच्या घरात एका खोलीत माझ्या सुनेने त्याची सर्व पेंटिंग्ज भिंतीवर छान रचनात्मक पद्धतीने लावून ठेवली आहेत.ये एकदा पहायला मग कळेल तुला.”
तिच्या कलाकार नातवाचं मला का कौतुक नसावं पण *त्या दिवसाचा एक अत्यंत बावळट चेहरा म्हणून*(Todays Face या मोडमध्ये) माझा क्रमांक नक्कीच लागला असता.
तिनं माझ्या वात्सल्य भावनांना अथवा ममत्त्वाला किती दुखावलं याचा तिला पत्ताही नसेल इतकी ती स्वतःत गुंतलेली होती. तिच्या “मीपणाच्या” रम्य कल्पना विश्वात ती मात्र खरोखरच खुशीत असावी. *खुदपसंत* यालाच म्हणतात का?
अशा अहंभावात रमलेल्यांना काय कळणार हो संत रामदासांचा दासबोध आणि युगंधराची गीता? हे लिहिताना “गाढवापुढे वाचली गीता” ही म्हण मात्र माझ्या मनात अगदी बिनदिक्कत प्रवेश करती झाली.
भगवत्गीतेनुसार “मीपण” म्हणजेच अहंकार, म्हणजेच दुःखाचे मूळ कारण. अहंकार सोडून निमित्तमात्र होऊन कर्म करणे, निस्वार्थ भावनेने जगणे आणि देहबुद्धी न ठेवता आत्मरूपाने राहणे,अहंकाराचे विसर्जन करणे, मीपण गळून जाणे हे तत्त्वज्ञान यांच्या कधीतरी पचनी पडो असाच धावा जणू मी या समस्त “मीपण” बाळगणाऱ्यांसाठी परमेश्वरापाशी करेन.
या “मीपण” असणार्यांच्या गोतावळ्यात जेव्हा मी चेंगरून जाते तेव्हा नकळत स्वतःलाही तपासून पाहते बरं का! मी थोडीच साधू संत आहे? तसे काही विकार माझ्यातही असणारच ना? *कोहम* हा प्रश्न माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा घुमतो तेव्हा मीही अशीच भांबावते. खरं म्हणजे त्या क्षणी ही जी काही माणसं माझ्या भोवती अहमन्यतेचे झेंडे घेऊन परिक्रमा करत असतात तेव्हा मी सावधपणे विचार करू लागते” मी कशी आहे?” यापेक्षा मी कशी असले पाहिजे याकडे आपोआपच लक्ष केंद्रित करते. झाडावरून एक पान अलगद माझ्या पायाशी गळून पडतं आणि तेव्हाच त्या गळून पडलेल्या पानाच्या स्वधर्माशी मी मला तपासून पाहते. माझ्यात असलेलं “मीपण” हे असंच या पानासारखं गळून पडावं. नको अहंकार, नको मोह, नको पाश. मुक्त तरी जोडलेलं, स्वतंत्र तरी नम्र. “मी आणि माझे” या रेषा ओलांडून पूर्णपणे विसावलेलं असं माझं मन असावं मग या सुखाच्या अविकारी मार्गावरून जाण्याची मला ओढ लागते पण जमेल का मला हे?
खरं म्हणजे मनातल्या मनात मी कधीतरी,माझ्या भोवतालच्या या अहंकाराने पछाडलेल्या माणसांचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच “मीपणा” गळावा या चिंतनयुक्त तत्त्व रेषेवर मी येऊन पोहोचलेली असते. समाजात अशा माणसांची होणारी थट्टा, उपहास, निंदा, नकोसेपण आणि पर्यायाने त्यांचे अंतिम एकटेपण पाहून मला या अवगुणांपासून दूर जावेसे वाटते.
एक असतो अर्ध्या हळकुंडात पिवळा होऊन समाजात स्वतःचीच पाठ थोपटत बडेजावात मिरवणारा तर दुसरा असतो साधक, तपस्वी,स्थिर,शांत, निगर्वी. त्याच्या ठायी असलेल्या महान कलागुणांचा त्याला इतकासाही दर्प नसतो, अहंकार नसतो. तो त्याच्या प्रेक्षकांसमोर श्रोत्यांसमोर, शिष्यगणांसमोर आणि स्वतःच्या कलेशीही सदैव लीन असतो. श्रेयस आणि प्रेयस मधल्या कलहात तो कधीच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत “मीपण” पार गळून गेलेला तो फक्त एक अभ्यासक असतो.
आज मी नसेन तशी,नाहीच पण उद्याच्या वाटेवर मी नक्की प्रयत्न करेन.
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा..
यातला “लहानपण” हा शब्द खूप व्यापक आहे.”लहानपण” म्हणजे मीपणा,मोठेपणा गळून गेलेला काळ.
“भगवंता माझ्यातले “मीपण” असेच गळून जावे इतकेच माझे मागणे”.
*राधिका भांडारकर*
