*ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असं पावसाचं येणं*
तप्त धरेला ती आस घन थेंबाला झेलणं,
ओल्या गंधाची चाहूल आभाळात मिसळणं..
मनातल्या मनातच आठवांचं गूज होणं,
जसं दाटल्या नभानं मनमुक्त बसरणं..
मेघातील कुजबुज कशी वार्याला कळणं?,
पिंगा घालत स्वत:शी त्याच मनस्वी फिरणं..
दामिनीचं चमकून क्षणोक्षणी हरवणं,
स्वप्न डोळ्यात घेऊन रिमझिम स्वर गाणं..
थेंबोथेंबी दडलेलं जगण्याचं नवं भान,
ओल्या वाटेवर चालू पावलांचं उमटणं..
गंधाळल्या मातीवर आठवणी साठवणं,
असं पावसाचं येणं मना हळूच भिडणं..
तप्त उन्हं झळावर डोळ्यांमध्ये धुसरणं,
वाळलेल्या स्वप्नांवर आठवांचं झिरपणं..
धूळ श्वासात शिरून मन शांतीत साचणं,
वार्याच्याही तालावर काही अंतरी तुटणं..
अचानक नभामध्ये गूढ सावळं दाटणं,
क्षितिच्या ओठांवर स्पर्श गार उमटणं..
धगधग धरेवर अलगद झिरपणं,
जीवनाच्या वाटेवर पुन्हा आशा उगवणं..
गंध पहिल्या थेंबाचा हळु मातीत मुरणं,
ओल्या रानाच्या श्वासात नवं जीवन फुलणं..
रिमझिम स्वर काळ क्षणी हलकं गुंफणं,
सावलीत थेंबाच्याही झणी मन गाणं होणं..
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
