खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलला जिल्हास्तरीय स्पर्धा
कुडाळ :
खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे भव्य जिल्हास्तरीय ‘सुपर सिक्स चॅलेंजर कॅरम स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा गुरुवार, १० एप्रिल २०२६ रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडणार आहे.
२०२६-२७ हंगामातील ही पहिलीच स्पर्धा असून सहभागी खेळाडूंना १०० रुपये नोंदणी शुल्क असणार आहे. विशेष म्हणजे सर्व खेळाडूंची प्रवेश फी आयोजकांकडून भरली जाणार असून प्रत्येक सहभागी खेळाडूला मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या ८ क्रमांकांना रोख बक्षिसे देण्यात येणार असून ‘व्हाईट स्लॅम’ आणि ‘ब्लॅक स्लॅम’साठीही आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे स्वरूप वेगळे ठेवण्यात आले असून सामने ८ ऐवजी ६ बोर्डांवर ३ सेटमध्ये खेळवले जाणार आहेत. खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आणि लोगो असलेला पांढरा टी-शर्ट व फुल पँट परिधान करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंना सकाळी नाश्ता/चहा तसेच संध्याकाळी स्नॅक्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२६ असून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, कणकवली, देवगड आणि मालवण येथील प्रतिनिधींकडे प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
नावनोंदणीसाठी संपर्क:
सावंतवाडी – राजेश निर्गुण (७५१७५३५०२८)
कुडाळ – शुक्राचार्य म्हाडेश्वर (९४२१२३८५१८)
वेंगुर्ले – ओंकार कुबल (७२७६५२३३७२)
कणकवली – अनिल कम्मार (९३७०५८८३०८)
देवगड – प्रकाश प्रभू (९४२३३०३८२२)
मालवण – संतोष बनसोडे (९४२३३०२७०७)
विशेष नियमावली (सुपर सिक्स चॅलेंजर):
स्पर्धा ‘सुपर सिक्स’ पद्धतीने खेळविण्यात येणार असून पारंपरिक ८ बोर्डांच्या ऐवजी ६ बोर्डांवर ३ सेटमध्ये सामने रंगतील. खेळात काही विशेष नियम लागू करण्यात आले असून खेळाडूंना सिंगल पीस डिफेन्स करता येणार नाही. स्वतःची सोंगटी किंवा क्वीनला स्ट्रायकरचा स्पर्श न करता दुसऱ्या सोंगटीला हलविण्यात येईल. चुकीच्या पद्धतीने फक्त दुसऱ्याच्या सोंगटीला स्ट्रायकरचा स्पर्श झाल्यास फाउल दिला जाईल. शक्य असल्यास हललेली सोंगटी/सोंगट्या पूर्वस्थितीत ठेवण्यात येतील. गेम टाय झाल्यास टायब्रेकर आणि सडन डेथचा वापर होईल. स्पर्धा एकाच खुल्या गटात खेळविण्यात येणार असून पहिल्या राऊंडपासून ६ बोर्डांचे ३ गेम खेळविण्यात येतील.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरम खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अवधूत भणगे आणि भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
