वैभववाडीचे संजय सावंत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
पुंडलिक दळवी, अवधूत शिरसाट यांच्यासह उपाध्यक्षपदी तिघांची निवड; सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी वैभववाडी येथील संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.
या सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध आणि एकमताने करण्यात आली. सभेचे वातावरण उत्साही व खेळीमेळीचे होते.
नवीन कार्यकारिणीत कार्यवाह म्हणून तळेरे येथील राजू जठार, तर सहकार्यवाह म्हणून कुडाळचे राजन नाईक यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाची जबाबदारी बागायतचे दीपक भोगले, सावंतवाडीचे पुंडलिक दळवी आणि कुडाळचे अवधूत शिरसाट यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच कोषाध्यक्षपदी वेंगुर्ले येथील नंदन वेंगुर्लेकर यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसाद पारकर, श्रीपाद चोडणकर, प्रल्हाद पावले, संजय भोगटे, दीपक बेलवलकर, गणेश बोर्डेकर, हर्षल बांदेकर, विजय केनवडेकर, संतोष नानचे, नंदकिशोर टोपले, सुधीर साटम, अश्विन पांगम आणि दिगंबर तांडेल यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून सौ. तृप्ती पारकर, अरविंद नेवाळकर, श्रीराम शिरसाट आणि निलेश धडाम यांची निवड करण्यात आली आहे.
ही संपूर्ण निवड प्रक्रिया अनिल सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत पार पडली.
