*एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका अन्य साथीदारांचा शोध घ्या*
*सुशांत दळवी खून प्रकरणाबाबत मा.आ. वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांची कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धडक*
कणकवली
शासकीय ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणाबाबत आज सायंकाळी उशिरा माजी आमदार वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांनी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये धडक देत पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली. केवळ एक आरोपी पडकून हे प्रकरण संपवू नका, केवळ एका व्यक्तीने हा खून केला असे दिसुन येत नाही त्यामुळे या खून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन इतर कोण व्यक्ती यात सामील आहेत का याचा शोध घ्या. सुशांत दळवी यांचा निर्घृणरित्या खून झाला असून या प्रकरणातील सर्व आरोपी गजाआड झाले पाहिजेत. अशी मागणी वैभव नाईक व कळसुली ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांकडे केली. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सांगितले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांशीही वैभव नाईक यांनी फोनद्वारे संपर्क साधून या प्रकरणाचा सखोल तपासा करण्याची मागणी केली.
यावेळी वैभव नाईक म्हणाले,सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणात कणकवली पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे आणि मुकादम असलेल्या व्यक्तीने खून केल्याची माहिती आम्हाला प्रसार माध्यमांमधून समजली आहे. मात्र या तपासावर ग्रामस्थांचा फारसा विश्वास नाही या प्रकरणाचा कसून तपास झाला पाहिजे. केवळ एक आरोपी हे करू शकत नाही यामागे अन्य साथीदार असण्याची दाट शक्यता आहे. जे लोक या प्रकरणात असतील त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना अटक झाली पाहिजे. चोर सोडून संन्यासाला फाशी किंबहुना या प्रकरणातले दोषी सुटतील आणि तिसऱ्यालाच अडकवले जाईल असा संशय ग्रामस्थांना वाटत आहे असे होता नये. असे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस उद्या कोर्टात देणार आहेत. सखोल तपास झाला नाहीतर आम्ही पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये येऊ असे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शितल दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुगंधा दळवी, माजी सरपंच अतुल दळवी, नंदू परब, सुदेश वारंग, रवी दळवी, सुशील सावंत, प्रणिक शेटे आदींसह कळसुली ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
