भरधाव दुचाकीची धडक; साटेली-भेडशी येथे अपघातात गोव्याच्या व्यक्तीचा मृत्यू
दोडामार्ग l प्रतिनिधी :
दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात गोव्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधोपचारासाठी येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ७:०० वाजता जोआओ बावतीस डिसोजा (वय ५३, रा. पिर्लेन-बार्देश, गोवा) हे आपल्या ॲक्टिवा (GA 03 AF 7514) दुचाकीने गोव्याहून भेडशी येथे औषधोपचारासाठी येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या होंडा शाईन (MH 07 Y 8053) वरील चालक पांडुरंग अनिल दळवी (वय २३, रा. घोटगे-येळपेवाडी) याने आपली गाडी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून डिसोजा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात जोआओ डिसोजा यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
याप्रकरणी मयताचा भाचा जॉन मार्सेलो ब्रागांनझा (वय २४, रा. गोवा) यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पांडुरंग दळवी याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू, जीव धोक्यात घालणे, धोकादायक वाहनचालक व वेगमर्यादा उल्लंघन आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास हवालदार देसाई (HC/711) करत आहेत.
