*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*जागतिक कविता दिन – २१मार्च*
मार्च महिना म्हणजे मराठी काव्य विश्वातील पाडगावकर आणि मर्ढेकर यांचा महिना.या सोबतच जागतिक काव्य दिन हा अनोखा संगम…
जगाला एकापेक्षा एक अजरामर काव्य प्रदान करणा-या सर्व कवींना कवयित्रींना गौरवण्याचा हा दिवस…
युनेस्कोने जागतिक काव्यदिनाची एकवीस मार्च रोजी पॅरिस परिषदेत या दिवसाची घोषणा केली..
अफाट सागरासारख्या असलेल्या आपल्या अंतर्मनात एखाद्या निवांत क्षणी खोलवर बुडी मारल्यावर लक्षात येतं की आपलं तन-मन नैसर्गिक उर्मीनं काठोकाठ भरलेलं आहे आणि मग सहजच कविता जन्माला येते.
आशा, निराशा, हर्ष, दुःख, प्रेम या विविध मानवी भावनांना लोकप्रिय असा आकृतीबंध आहे आणि तो विविध प्रकारात व्यक्त होत असतो.अवतीभवती पाहताना जे नजरेस आले त्यातील घटनांचा मनात उठणारा तो तरंग म्हणजेच कविता…
कविता म्हणजे काय ? मन हुंकाराची साथ.. जिथे अर्थवाही.. प्रभावी.. एक स्वगत.. जागत असतात शब्द अर्थ..!
एखाद्या कोऱ्या कागदावर असं काही मांडणं की ज्यात सर्व भाव उमटून दिसावेत…सर्व भाव एकत्र येऊन सुरू होते शब्द शोधण्याची प्रतिक्रिया मग त्या शब्दांच चिंतन करून तयार होतात ओळी आणि त्या ओळींमधून बनते एक कविता…
प्रत्येक कवितेचे वेगवेगळे अर्थ असतात… कविताकार होण्यासाठी लिहिणं महत्वाचं असतंं. कवितेचं वाचन करून ती समजून घेणं सुद्धा ही एक कला आहे….सर्वजण कविता वाचतात.. पण..सर्वानाच ती कळेलच असं नाही … म्हणून तर म्हणतात ना जोपर्यंत कवितेचे पेय कोणी पित नाही तो पर्यंत कितीही प्रयत्न केला तरी ती कवितापेय गळी उतरत नाही …कारण कविता वाचत नसतात तर कविता अनुभवतात… जेव्हा शब्दांचा स्पर्श अंगावर शहारे आणतात तेव्हा समजून जा की ती तुमच्यापर्यंत पोहोचली..अगदी काळजाच्या दाराला जाऊन भिडली…पण एक मात्रं नक्की मला उमगले की कविता कधीच लिहिली नाही जात नाही ती हृदयातून कागदावर आपोआप मांडली जाते…
कविता म्हणजे
कवी मनाचे प्रतिबिंब
भरल्या मनामध्ये भावना
भिजवितो शब्दांनी चिंब चिंब
एका अवचित क्षणी कवी/ कवयित्री बोलू लागतात आणि मनातल्या प्रेम,
भाव- भावना, हुंदके सारं सारं काही काव्यरूपी लेखणीरूपी शब्द होऊन भराभरा कागदावर उतरू लागतात आणि फुलं होऊन ओंजळीत बरसतात..
मनामध्ये विचारांचा कल्लोळ झाल्यावर कविता विचारांना दिशा शब्दचं मदत करू शकतात नाही का?
शब्दांच्या माध्यमातून होणारा भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक म्हणजेच कविता…
शब्द म्हणाले मज
गवसण्यास आम्हाला
ओलांडून वेस या नजरेची
घे भेट त्या सोनेरी क्षितीजाची
*सर्व कवींना, कवयित्रींना आजच्या जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
