*सूरमयी साहित्य समूह सदस्य, पत्रकार लेखक कवी जोतिबा पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अवकाळी तुझ्या येण्याने…!*
अवकाळी तुझ्या येण्याने
मनी काळजी दाटून येते,
बळीराजाच्या त्या डोळ्यांत
टचकन पाणी साचून जाते…!
भल्या मोठ्या गारांचा
पिकांवर बसतो घाव,
क्षणात फळबागांचा
उध्वस्त करितो गाव…!
मेघांच्या त्या गडगडाटात
भयाची छाया दाटते,
कष्टाने वाढवलेली पिके
क्षणात नामशेष करते…!
विश्वासाच्या त्या घरट्याचे
डोईवरचे छप्पर उडते,
मनातील आशेचे दिवे
क्षणात विझून जाते…!
निसर्गाच्या या खेळामध्ये
माणूस होतो अगतिक,
आशा निराशेचा लपंडाव
किती झेलेल सदा थकित…!
उद्याचा सूर्य उगवेल
अशी स्वप्ने मनी पाहतो,
पुन्हा नव्या जिद्दीने उठून
आशावादी जीवन जगतो…!
स्वच्छंद पाखरू…!
जोतिबा पाटील, कांदबरी.
