*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठव गाभुळलेले*
घरासमोरी सुंदर अंगण मातीचे ओले
बघ वृंदावन तुळस मंजिरी मधेच सजलेले
उंबरठ्याशी रांगोळीची शुभ्र रेघ साजे
गोड बोलता माणुसकीची बघ टाळी वाजे
प्राजक्ताच्या झाडाखाली पखरण सुमनांची
अत्तरदाणी अवघी धरती घागर सौख्याची
आलेगेले अतिथी म्हणुनी राहुनिया गेले
घासामधला घास काढुनी भुकेल्यास दिधले
वडीलधारी गोपाळांचा मेळा हो जमला
वास्तुपुरुषही बघून सारे मनी तृप्त झाला
घर म्हणताना नसती नुसत्या चार आठ भिंती
नजर कुणाची मुळी न लागो सदैव मन चिंती
कौलारू त्या छपरामधुनी पागोळ्या झरती
मातीच्याही गंधामधुनी आठव गाभुळती
©️®️ डॉ मानसी पाटील
