*डिजिटल युगात पत्रांची गोडी; घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पोस्टाने मराठी नववर्षाच्या शुभेच्छा*
*पोस्टाच्या माध्यमातून जपली परंपरा; विद्यार्थ्यांकडून अधिकारी व मान्यवरांनाही शुभेच्छा**
बांदा* (दि.१७/०३/२०२६)
डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता हरवत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशाने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मराठी नववर्षानिमित्त पोस्टाच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात शुभेच्छा पोस्टकार्ड तयार केली. या पोस्टकार्डमध्ये त्यांनी मराठी नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करत आकर्षक चित्रे, रेखाचित्रे व संदेशांचा समावेश केला. विद्यार्थ्यांनी सजावट आणि संदेश लेखन या सर्व बाबींमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला व अभिव्यक्तीक्षमतेला वाव मिळाला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची सवय लागावी, मराठी भाषेची गोडी वाढावी तसेच पारंपरिक संवाद पद्धतीचे महत्त्व समजावे हा मुख्य उद्देश होता. पत्र तयार करण्यापासून ते पत्ता अचूक लिहिणे पोस्टाद्वारे पत्र पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही शुभेच्छा पोस्टकार्डे केवळ आप्तेष्टांपुरती मर्यादित न ठेवता विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी तसेच समाजातील मान्यवर व्यक्तींनाही पाठवली आहेत. सध्या ही पत्रे संबंधितांपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत असून विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा समाजाशी संवाद वाढण्यासही मदत होत आहे.
या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांना पत्रलेखनासारख्या पारंपरिक माध्यमाची ओळख करून देणे आवश्यक आहे. या उपक्रमातून त्यांच्या भाषिक कौशल्यासोबतच सामाजिक जाणीव आणि संवाद क्षमता विकसित होत आहे.”
या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत असून शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे.डी.पाटील तसेच सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
