राज्य मंत्रिमंडळाची १००% VGF ला मंजुरी; पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना
पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांना मिळणार खात्रीशीर आणि नियमित सेवा
वेंगुर्ले :
सिंधुदुर्गवासीयांसाठी तसेच पर्यटकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून सुरू असलेली मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १००% ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. मात्र, मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा नियमित नसल्यामुळे पर्यटनावर त्याचा परिणाम होत होता. आता शासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून स्थानिक हॉटेल व्यवसायिक, टॅक्सी चालक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दररोज विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी व्यवहारांना गती मिळणार आहे. तसेच सण-उत्सवांच्या काळात चाकरमान्यांना प्रवासाचा सोयीस्कर आणि खात्रीशीर पर्याय उपलब्ध होणार आहे. तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, चिपी विमानतळावरील विस्कळीत विमानसेवेबाबत प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत होती. ही सेवा नियमित व्हावी यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
“सिंधुदुर्गच्या विकासासाठी चिपी विमानतळ हा कणा आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने १००% VGF देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा सुरू राहील आणि यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल,” असे नितेश राणे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच नव्या वेळापत्रकानुसार नियमित विमानफेऱ्या सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे
