महाराष्ट्राचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव व सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री विकास खारगे यांना घडविणारे त्यांचे वडील श्री शंकर खारगे यांच्या “अक्षरयात्री” या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका कौटुंबिक वातावरणात संपन्न झाला. ९६ वर्षीय ज्येष्ठ शिक्षक शंकर गोविंद खारगे यांच्या जीवनकार्यावर आधारित बापूजी :अक्षरयात्री समाजसेवक हे शीर्षक असलेल्या या पुस्तकाची ई–पीडीएफ मिशन आयएएस चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांच्यामार्फत माझ्या हातात पडली आणि ती मी पूर्ण वाचून काढली.
वाचताना एका साध्या पण विलक्षण कार्य करणाऱ्या शिक्षकाचा दीर्घ प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेपासून सुरू झालेला आणि आजपर्यंत पोहोचलेला हा प्रवास या पुस्तकातून अतिशय संवेदनशील शब्दबंधात मांडला आहे.
शंकर गोविंद खारगे मास्तर, ज्यांना अनेकजण प्रेमाने बापूजी म्हणून ओळखतात, यांनी आयुष्यभर शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा केली. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, ज्ञानाची ज्योत प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी, या ध्येयाने त्यांनी शिक्षक म्हणून आपले संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केले.
त्या काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील अनेक खेड्यांमध्ये शिक्षणाची परिस्थिती अत्यंत मर्यादित होती. शाळांची संख्या कमी, शिक्षकांची कमतरता आणि शिक्षणाबद्दल जागृतीही कमी होती. तेव्हा १९४८-४९ च्या काळात आजूबाजूच्या लहान खेड्यामधून अंधश्रद्धा प्रचंड बोकाळली होती. शिक्षण घेतले की शहाणपण येते यापेक्षा शिकून मुले बिघडतात, धर्म बुडवतात, संस्कार विसरतात अशाच समजूतींचा पगडा जास्त असायचा याशिवाय मुलांना शाळेत पाठविण्यापेक्षा घरच्या कामात त्याला गुंतवावे जेणेकरून चार पैसे वाचतील हा विचार त्यावेळी समाजात असायचा अशा विपरीत परिस्थितीत खारगे मास्तरांनी गावोगावी फिरून लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
मुलांना शाळेत आणणे, पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे आणि समाजात ज्ञानाची ज्योत पेटवणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनले.
त्यांनी जवळपास ३० वर्षे पगारी शिक्षक म्हणून सेवा केली, परंतु त्यांची सेवा केवळ नोकरीपुरती मर्यादित नव्हती. निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षणासाठी काम करणे थांबवले नाही. पुढील ४५ वर्षे त्यांनी समाजशिक्षणाचे विनामूल्य कार्य केले. अशा प्रकारे जवळपास ७५ वर्षे त्यांनी शिक्षणसेवेसाठी अर्पण केली, जे कोणत्याही शिक्षकासाठी अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे.
खारगे मास्तरांचे आयुष्य साधेपणाने भरलेले होते. घर सांभाळणारी पत्नी रुख्मिणी. खारगे मास्तरांची सावली म्हणूनच ओळखली जायची. मास्तरांनी आपल्या शिक्षकी पेशात प्रसिद्धी किंवा मान-सन्मानाची अपेक्षा न ठेवता हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली आणि अनेक कुटुंबांमध्ये शिक्षणाची परंपरा निर्माण झाली.
या खारगे मास्तरांच्या महान जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित “अक्षरयात्री समाजसेवक” या पुस्तकाचे कौटुंबिक सोहळ्यात प्रकाशन नुकतेच करण्यात आले. खारगे मास्तरांच्या जीवनप्रवासाचे जतन करण्यासाठी अनेक व्यक्तींनी सहकार्य केले. त्यामध्ये शिक्षण संस्थांशी संबंधित पदाधिकारी, शिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जुनी महिती, आठवणी आणि छायाचित्रे जतन करण्यास मदत केली. त्यांच्या कुटुंबियांनी उद्धव साहेब, अशोक साहेब, माणिक साहेब, विजय साहेब, विकास खारगे साहेब, बापू तारदाळकर सर, राजा कदम सर, मनोज तांबे सर, उदय कुलकर्णी सर यांनीही या स्मरण यात्रेत महत्वाची भूमिका बजावली.या प्रसंगी अमरावतीचे डॉ. नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन आय ए एस यांनी स्वतः इचलकरंजी येथे जाऊन शंकर खारगे उर्फ बापूजी यांना मिशन आय ए एस तर्फे सन्मानपत्र बहाल केले आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा प्रसंग खारगे मास्तरांच्या दीर्घ आणि निस्वार्थ शिक्षणसेवेचा गौरव करणारा ठरला.
आज शिक्षणाच्या क्षेत्रात आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध आहेत. तरीही खारगे मास्तरांनी ज्या निष्ठेने आणि समर्पणाने शिक्षणाची सेवा केली, ती प्रेरणा आजही प्रत्येक शिक्षकासाठी मार्गदर्शक आहे.
शिक्षकाचे कार्य केवळ वर्गात धडा शिकविण्यापुरते मर्यादित नसून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून सिद्ध करून दाखविले.
म्हणूनच समाजाने त्यांना सन्मानाने “अक्षरयात्री समाजसेवक शंकर खारगे” ही उपाधी दिली. त्यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आजही असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवित आहे.
थोर तत्ववेत्ता अल्बर्ट आईन्स्टाइन म्हणतो की, शाळेत शिकलेल्या गोष्टी विसरल्यानंतर जे उरते ते म्हणजे शिक्षण होय.तीच पाऊलवाट खारगे मास्तरांनी निवडली.
ज्ञानाच्या सेवेत आयुष्य अर्पण करणाऱ्या या थोर शिक्षकाला समाजाचा हा कृतज्ञतेचा सलाम.त्याचबरोबर शंकर गोविंद खारगे नऊ अक्षरांचे मालक. शिकणे आणि शिकविणे एवढाच उद्योग केला. कुटुंबाचा सांभाळ केला. समाजाचे हित साधले. देण्यासारखे सर्व दिले. सर्वांचे प्रेम मिळविले. आयुष्याचे सार्थक झाले. शिक्षणाची मास्टरकी (चाबी) हाती आल्याशिवाय आयुष्यात यशाचे दरवाजे उघडणार नाहीत हे ओळखून अखंडपणे मास्तरकीत रमलेल्या एका समाज शिक्षकाची आणि एका निःस्वार्थ दीपस्तंभाची ही गोष्ट आहे.
=============
रवींद्र दांडगे
जनसंपर्क अधिकारी
मिशन आय ए एस
अमरावती
9404545238
