*शिवजयंतीचे औचित्य साधून शिव विचारांचा जागर*
रेडी
तिथी फाल्गुन वद्य तृतीया, शिवजयंतीचे औचित्य साधून इनामदार श्री देवी भगवती देवस्थान कोटकामते, देवगड ह्यांच्या कडून इतिहासाची साधने ह्या कार्यक्रमांतर्गत शस्त्र, ग्रंथ, छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी ह्या संस्थांच्या सहकार्याने इतिहास अभ्यासक व संकलनकर्ते ज्ञानेश्वर राणे ह्यांनी मार्गदर्शन केले.
इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते यांच्या आयोजित शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही छत्रपती श्री शिवाजी महाराज ह्यांच्या पुजनाने करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ व कोटकामते गावातील सर्व शालेय विद्यार्थी,शिक्षक, पालक ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कोटकामते गावाची व मंदिराची असलेली ३५० वर्षांपूर्वीची परंपरा व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या ह्या गावाचे ऐतिहासिक संदर्भासह माहिती सांगण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर भाषणे करून त्यांच्या स्मृतीना उजाळा दिला.
इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे ह्यांनी उपस्थिताना प्रदर्शनात मांडलेल्या प्रत्येक गोष्टीचा ऐतिहासिक संदर्भ देऊन कसा,कोणत्या, प्रसंगी वापर केला जाई ह्याबद्दल खूपच छान मांडणी करुन माहिती दिली. तसेच शालेय जीवनात इतिहासाची आवड व त्यातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचारानुरूप व्यक्तिमत्व विकास कसा करता येईल ह्याची देखील सुंदर माहिती दिली. ऐतिहासिक पुस्तके व त्यातील वाचनीय पुस्तकांचे संदर्भासह असलेले लिखाण ह्यांचा संग्रह व पत्रे, चित्रे, गडकोट, विरगळ, सती शिळा यांची छायाचित्रे व माहिती, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, जिरेटोप, नागीन,मराठा धोप,खंड्या तलवार,उर्मी,बाण, कुलूप, पुरातन चलनीय नाणी व आरमारात वापरात येणाऱ्या जहाजांच्या प्रतिकृती व ग्रंथ ह्यांचा समस्त ग्रामस्थांनी ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून लाभ घेतला.
