जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा;
गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर माहिती घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गॅस एजन्सी धारक तसेच तहसीलदारांना आवश्यक सूचना दिल्या. सर्व गॅस वितरकांनी संयमाने काम करावे व नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय आस्थापना, रुग्णालये तसेच वसतिगृहे यांना व्यावसायिक सिलिंडर प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
केंद्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अधोरेखित केले. गॅस वितरण प्रणाली अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक व्हावी यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सर्व वितरकांनी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होऊ नये यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तपासण्या करण्यासाठी तहसीलदार पथकप्रमुखांच्या माध्यमातून भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये. केंद्र शासनाच्या सूचनांचे व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा साठा असूनही काही ठिकाणी नागरिक एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचेही या बैठकीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले.
