You are currently viewing 14 मार्च कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या पुण्यतिथीनिमित्त

14 मार्च कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या पुण्यतिथीनिमित्त

सुरेश भट : जसे दिसले तसे

एखाद्या मराठी कवीच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी भारताच्या माननीय राष्ट्रपतीने नागपूरला यावे म्हणजे ही फार मोठी गोष्ट झाली. ही गोष्ट अमरावतीचे सुपुत्र व नंतर नागपूरला स्थायिक झालेले कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्याबाबतीत घडून आली आहे. केंद्रीय मंत्री. मा. श्री नितीन गडकरी व मा. श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने नागपूरच्या रेशीमबाग मैदानात जे स्व. सुरेश भट सभागृह झाले त्याच्या उद्घाटनाला तेव्हाचे भारताचे राष्ट्रपती नागपूरला आले. एवढा मोठा गौरव. मरणोपरांत का होईना हा मान कविवर्य श्री सुरेश भट यांना मिळाला आहे.

त्यांच्या कविता त्यांचे माणुसकी पणे वागणे त्यांचा दलितांमध्ये बहुजन समाजामध्ये असलेला सर्वदूर वावर यामुळे व त्यांनी गझल हा प्रकार मराठी भाषेमध्ये खऱ्या अर्थाने रुजविल्यामुळे आज सुरेश भट दुभंगून जाता जाता मी अभंग झालो या त्यांच्या ओळीला पात्र ठरले आहेत. सुरेश भटांना जो आज नावलौकिक मिळतो आहे असा नावलौकिक फार कमी जणांच्या वाटायला येतो. आज सुरेश भट आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या कविता गीते व गजला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात देखील प्रचंड दाद मिळवून जात आहे. याला कारण त्यांनी जे काही लिहिले ते हृदयापासून लिहिले. त्यामुळे त्यांच्या रसिकांच्या हृदयात जाऊन ते भिडले.

शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे लता मंगेशकर आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर सभागृहात आणि सुरेश भट स्टेजवर. शिवाजी रंग मंदिरामध्ये मुंबईला दादरला झालेल्या या कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. सुरेश भटांचा सहाय्यक म्हणून मी या कार्यक्रमाला गेलो होतो.

सुरेश भट यांनी आयुष्यभर कविता गझल गीते याबरोबर माणसे जोडण्याचे ही काम केले आहे. त्यांच्या मित्रमंडळीमध्ये सर्व प्रकारचे मित्र होते
त्यामध्ये सर्वश्री अरविंद ढवळे डॉ. मोतीलाल राठी वली सिद्दिकी रामदासभाई श्राफ दादा इंगळे प्रभाकरराव वैद्य व रजुवा मिश्रा यांचा समावेश होता. खऱ्या अर्थाने मित्रांनी सुरेश भट यांना सांभाळले. आणि म्हणूनच सुरेश भटांचा पहिला कवितासंग्रह रूपगंधा हा त्यांनी त्यांचे जवळचे मित्र व अमरावती गॅस कंपनीचे संचालक श्री रामदासभाई श्राफ यांना अर्पण केला. या सर्व मित्रांना सुरेश भटांच्या बहुतांश कविता पाठ होत्या.

सुरेश भटांनी पत्रकार म्हणून वार्ताहर म्हणून स्तंभलेखक म्हणून काम तर केलेच पण त्याचबरोबर त्यांनी खऱ्या अर्थाने गझल मराठीमध्ये रुजविली .गझल लिहिणारा संप्रदाय तयार केला .आज सुरेश भट जरी नसले तरी महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्र लगत असलेल्या मध्यप्रदेश मधीलही मराठी कवी कवयित्री चांगली गझल लिहायला लागलेले आहेत. आणि आज गझलला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे .पण त्यासाठी कविवर्य सुरेश भटांनी आपले सर्वस्व पणाला लावलेले आहे हे मान्य करावेच लागेल .

अरविंद ढवळे आणि डॉ. मोतीलाल राठी ह्या माझ्या दोन ज्येष्ठ मित्रांमुळे मी सुरेश भटांच्या जास्त संपर्कात आलो. आमची मैत्री एवढी वाढली की सुरेश भट अनेक वेळा माझ्या तपोवनच्या घरी मुक्कामी असायचे . त्याला कारणही तसेच होते. तेव्हा सर्वांची घरे लहान होती. पण माझा जनसंपर्क लक्षात घेऊन पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन व त्यांच्या कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी मला एक पाच रूमचे अतिरिक्त निवासस्थान दिले होते.आमची सगळी फौज सुरेश भटांच्या स्वागतासाठी व आदरतिथ्य करण्यासाठी सदैव रात्री बे रात्री तयार असायची.

कविवर्य सुरेश भटांचे आणि राजकीय लोकांचे घनिष्ठ संबंध होते. हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे हे नागपूरला आले आणि सेंट्रल पॉईंटला थांबले तर आठवणीने सुरेश भटांना भेटायला बोलवायचे. प्रोटोकॉलमुळे ते श्री सुरेश भट यांच्याकडे जाऊ शकत नव्हते. त्यांना बंधने होती. सर्वश्री शरद पवार सुधाकरराव नाईक यशवंतराव गडाख सुशील कुमार शिंदे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एक प्रचंड मोठे काम श्री शरद पवारांनी माझ्यासमोर सुरेश भटांच्या शब्दाखातर एका मिनिटात करून दिले होते. तीच गोष्ट सुधाकरराव नाईकांची. सुधाकर राव नाईक नागपूरला आले तर कितीही महत्त्वाची माणसं असो ते म्हणाले पहिला मान सुरेश भटांना द्यायचे आणि सुरेश भट यांची अँटी चेंबरमध्ये भेटल्यानंतरच ते इतरांना भेटायचे. सुशीलकुमार शिंदे यांचे देखील असेच त्यांचे नाते. सुरेश भटांच्या निधनानंतर आम्ही जो झंजावात त्यांच्या आठवणींचा ग्रंथ तयार केला त्याच्या प्रकाशनासाठी सुशील कुमार शिंदे सारी कामे बाजूला सारून अमरावतीला आले .तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

सुरेश भटांनी
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
मेहंदीच्या पानावर मन माझं झुलते ग
उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
सुन्या सुन्या मैफिलीत तुझेच मी गीत गात आहे
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणील आरतीला हे चंद्र सूर्यतारे
हे भिमराया घे या लेकरांची वंदना
अशी कितीतरी लोकप्रिय गीते लिहून जनमानसांमध्ये आपला कायमचा ठसा उमटविला आहे. आज सुरेश भट आपल्यात नाहीत. पण त्यांच्या गीतांमुळे गजलांमुळे व कवितेमुळे ते अजरामर झालेले आहेत यामध्ये शंकाच नाही.

सुरेश भट यांनी एक पिढी घडविण्याचे काम केलेले आहे. ती पिढी आज सुरेश भटांचा वारसा समर्थपणे चालवीत आहे. रहे ना रहे हम महका करेंगे याचा प्रत्यंतर आपल्याला आज येत आहे. या माणसाच्या संपर्कात दीर्घकाळ राहण्याचा मला अनुभव आहे. किमान 100 पत्रे त्यांनी मला लिहिलेली आहेत. त्याचा लवकरच मी संग्रह प्रकाशित करणार आहे.
आज सुरेश भटांची पुण्यतिथी
योगायोगाने महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने सायंकाळी सहा वाजता अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये सर्व महाराष्ट्राच्या कला सादर करणारा महाराष्ट्राची लोककला हा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवलेला आहे हा योगायोग आहे.

सुरेश भट हे अमरावतीचे आहेत याचा मला अभिमान आहे. मी महाराष्ट्रात जिथे जिथे व्याख्यानासाठी जातो कवी संमेलनासाठी जातो तिथे तिथे लोक सुरेश भटांचे नाव काढतात आणि तेव्हा कळते की आपण एका फार मोठ्या अनन्यसाधारण अशा व्यक्तिमत्त्वाच्या बरोबर होतो. आज आम्ही व आमच्या ज्येष्ठ मित्र मंडळींनी त्यांना जी साथ दिलेली आहे ती शब्दातीत आहे. अशा या मराठी सारस्वताला मनापासून मानाचा मुजरा..

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा