शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घेतली भेट
प्रशासकीय विलंब व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागातील त्रुटींवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील प्रशासकीय त्रुटी, कामकाजातील विलंब आणि शिक्षक-शाळांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीस कॅबिनेट मंत्री भरत गोगावले तसेच कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल उपस्थित होते.
या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सध्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार अनेक अडचणींमधून जात असून शाळा, शिक्षक आणि संस्थाचालकांना प्रशासकीय कामांसाठी मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत असल्याची बाब संजय आग्रे यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, सुटसुटीत आणि जलद गतीने होणे आवश्यक असल्याचे आग्रे यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, शालेय प्रशासकीय प्रक्रियेतील गुंतागुंत तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांमध्ये होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली.
तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. शिक्षण विभागातील कामकाजात सुधारणा झाल्यास त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला होईल, असा विश्वास आग्रे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाची स्वतंत्र बैठक लवकरच बोलावण्यात येईल, असे जाहीर केले. या बैठकीत सर्व तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींवर सखोल चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल आणि प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
