सावंतवाडीतील श्री एकमुखी दत्त व वासुदेवानंद सरस्वती मंदिरात २ एप्रिलला कलशारोहण सोहळा
३० मार्चपासून विविध धार्मिक विधी, कीर्तन व भक्तीमय संगीत कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी
सबनिसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सर्व भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन सल्लागार उपसमिती, सावंतवाडी यांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सोमवार दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता कलश दिंडीने होणार असून ही दिंडी मराठी शाळा क्र.४ येथून सुरू होऊन निर्माणभवन, जगन्नाथराव भोसले उद्यान, मिलाग्रिस हायस्कूल, सालईवाडा-बाजारपेठ, गांधी चौक, नारायण मंदिर, बसस्थानक, काझी शहाबुद्दीन हॉल, इस्वटी महापुरुष मार्गे एकमुखी दत्त मंदिर येथे येऊन समाप्त होईल. रात्री ८ वाजता श्रींची आरती होईल.
मंगळवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शांतीपाठ, प्रायश्चित्त विधी, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, देवतांचे आवाहन, पूजन तसेच अग्निस्थापन आदी धार्मिक विधी होणार आहेत. सायंकाळी महाप्रसादानंतर ‘सूरश्री’ प्रस्तुत सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा “भक्तीरंग” हा भक्तीगीते कार्यक्रम तसेच श्री. निलेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली “हे सुरांनो चंद्र व्हा” हा नाट्यगीत, अभंग व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. १ एप्रिल रोजी आवाहित देवतांचे पूजन, पवमान अभिषेक, होमहवन आदी विधी होणार असून सायंकाळी तुलशीपूजा, आरती व महाप्रसाद होईल. रात्री ‘स्वरसाद’ नामस्मरण तसेच अभिनव संगीत मंडळाचा “स्वरधारा” हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य कलशारोहण सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुपारी १२.०१ वाजता संकेश्वर मठाचे श्रीमत् प.प. विद्यानारायण स्वामी भारती शंकराचार्य यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या वेळी श्रीमत् प.पू. शरद जोशी महाराज (वासुदेव निवास, पुणे), श्रीमत् प.पू. दयानंद भारती स्वामी महाराज (श्रीपाद मठ, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी) तसेच आमदार दीपकभाई वसंतराव केसरकर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी ह.भ.प. स्नेहलदिप प्रभाकर सामंत यांचे कीर्तन होईल. त्यानंतर श्रींची आरती, पालखी सोहळा आणि रात्री ‘नादब्रह्म’ हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या उत्सवासाठी श्री. सुधीर श्रीपाद धुमे, श्री. खेमराज उर्फ बाबु न्हानु कुडतरकर, श्री. अशोक महादेव नाईक, श्री. दयानंद दत्ताराम गवस व श्री. रघुवीर (भाई) सिताराम मंत्री आदी पदाधिकारी कार्यरत असून सर्व भक्तांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
