सावंतवाडीत ‘घे भरारी फाऊंडेशन’चा महिला दिन उत्साहात साजरा
महिलांचा गौरव, दिव्यांग मुलांचा सन्मान आणि ‘कृष्णभोजन’ दशावतारी नाट्यप्रयोगाने रंगली संध्या
‘घे भरारी फाऊंडेशन’ च्या कार्याध्यक्षा मेघना राऊळ यांच्या सूत्रसंचालनाने रंगली मैफल
सावंतवाडी :
जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘घे भरारी फाऊंडेशन’, सावंतवाडीने येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, दिव्यांग मुलांचा गौरव, मजेशीर खेळ, झटपट प्रश्न, दशावतारी नाट्यप्रयोगाने कार्यक्रम उत्तरोत्तर बहारदार होत गेला. साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्रातील चिमुकल्या मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन झाले.
यावेळी पोलीस अधिकारी ज्योती दूधवडकर, सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका तथा उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले, नगरसेविका दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, नीलम नाईक, सामाजिक कार्यकर्त्या संजना संजू परब, प्राजक्ता सावंत, तरुण भारत संवादच्या उपसंपादक मंगल नाईक-जोशी यांचा शाल, श्रीफळ , गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
उद्योजक महेश कुमठेकर व दशावतारी कलाकार गौरव शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी घे भरारीच्या संस्थापिका मोहिनी मडगावकर, अध्यक्षा रेखा कुमठेकर, कार्याध्यक्षा मेघना राऊळ, उपाध्यक्षा संध्या पवार, सचिव सलोनी वंजारी, खजिनदार स्वप्नाली कारेकर, सल्लागार शारदा गुरव, सदस्य गीता सावंत, मेघना साळगावकर, ज्योती दूधवडकर, गीता लोहार, सीमा रेडीज, सुस्मिता नाईक, मेघा भोगटे, वैष्णवी बांदेकर, अरुणा नाईक, प्रतीक्षा गावकर, शरदिनी बागवे, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, सरिता फडणीस, रीमा रेडीज, चित्रा बाबर देसाई, दीपाली तांडेल, साक्षी परुळेकर, भूमी पटेकर, कल्पना बांदेकर, सीमा मठकर, साहस प्रतिष्ठानच्या सौ. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी नवीन महिलांनी ‘घे भरारी’ फाऊंडेशनचे सदस्यत्व घेतले. त्यांना फाऊंडेशनचा बॅच प्रदान करण्यात आला.
लहान मुलांनी व घे भरारी फाऊंडेशनच्या सदस्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फाऊंडेशनच्या कार्याध्यक्ष मेघना राऊळ यांनी कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या झटपट प्रश्नांना रसिक महिलांनीही उत्तम दाद देऊन बक्षिसे पटकावली. मेघना राऊळ यांनी ‘ पल पल दिल के पास’, संध्या पवार यांनी ‘ तुझी चाल तुरुतुरु’ व साची दळवी यांनी ‘ तुझ्याविना संसाराचा कारभार चालना..’ या कराओके गायनाने रसिकांची मने जिंकली. त्यानंतर घे भरारी फाऊंडेशन च्या सदस्यांनी सादर केलेले गौरव शिर्के लिखित व दिग्दर्शित ‘कृष्णभोजन’ दशावतार नाटक प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले. प्रथमच हुबेहुब अभिनय साकारून या महिलांनी व्यासपीठ दणाणून सोडले व उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. यामध्ये मोहिनी मडगावकर, मेघा भोगटे, वैष्णवी बांदेकर, वंदना मडगावकर, रेखा कुमठेकर, समीक्षा मडगावकर, अरुणा नाईक, सलोनी वंजारी, सुस्मिता नाईक, वैभवी घाटगे, स्वप्नाली कारेकर यांनी भूमिका साकारल्या. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन गौरव शिर्के यांनी व संगीतसाथ वैभव पाटकर, निलेश मांजरेकर, समीर मांजरेकर यांनी दिली.
सर्वात शेवटी लकी ड्रॉमध्ये तीन लकी महिलांना साडी स्वरूपातील बक्षीस देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा मेघना राऊळ यांनी केले.
