You are currently viewing देवगड पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व; सभापतीपदी गणेश राणे, उपसभापतीपदी अमोल लोके यांचे नामनिर्देशन

देवगड पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व; सभापतीपदी गणेश राणे, उपसभापतीपदी अमोल लोके यांचे नामनिर्देशन

चार वर्षांनंतर पंचायत समितीत लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होण्याची तयारी

देवगड :

देवगड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी आज महत्त्वाची प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाजपचे गणेश सदाशिव राणे तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे अमोल विजय लोके यांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. ही नामनिर्देशन पत्रे पीठासन अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सादर करण्यात आली.

देवगड पंचायत समितीमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू होता. १३ मार्च २०२२ पासून पंचायत समितीवर प्रशासक कार्यरत होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींची दालने बंद होती. मात्र आता चार वर्षांनंतर पंचायत समितीमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींचे दालन खुले होत असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभाराला नव्याने सुरुवात होत आहे.

देवगड पंचायत समितीत महायुतीची एकहाती सत्ता आहे. पंचायत समितीमध्ये एकूण १४ सदस्य असून त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे १२ तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे २ सदस्य आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदावर महायुतीचे उमेदवार निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सभापती पदासाठी भाजपने गणेश सदाशिव राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. गणेश राणे हे नाडण गणातून बिनविरोध निवडून आले आहेत. तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे अमोल विजय लोके यांच्या नावावर पक्षाकडून अधिकृत निर्णय घेण्यात आला असून त्यांनी कुणकेश्वर गणातून निवडणूक जिंकून पंचायत समितीत प्रवेश केला आहे.

गणेश राणे आणि अमोल लोके यांनी पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली. यावेळी माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, देवगड पंचायत समितीच्या इतिहासात लोके कुटुंबाचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. १९६२ ते १९६७ तसेच १९६७ ते १९७२ या कालावधीत प्रिन्सिपल आर. आर. लोके यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते. त्यानंतर तब्बल ५४ वर्षांनी लोके कुटुंबातील अमोल लोके यांना पंचायत समितीच्या उपसभापती पदावर काम करण्याची संधी मिळत असल्याने हा क्षण त्यांच्या समर्थकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

आज होणाऱ्या सभेत सभापती व उपसभापती पदाची अधिकृत निवड जाहीर होणार असून त्यानंतर देवगड पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींच्या कारभाराला औपचारिक सुरुवात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा