You are currently viewing वेंगुर्लेत हिंदु नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सभा उत्साहात संपन्न

वेंगुर्लेत हिंदु नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सभा उत्साहात संपन्न

*वेंगुर्लेत हिंदु नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सभा उत्साहात संपन्न*

*नववर्ष स्वागत यात्रेचा शुभारंभ शंखनादाच्या मंगल ध्वनीने होणार .*

वेंगुर्ला :

येत्या गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन करण्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू धर्माभिमानी नागरिकांची नियोजन सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत स्वागत यात्रेचे स्वरूप, विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग कसा वाढवता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावर्षीची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दरवर्षी प्रमाणेच वेंगुर्ले शहरात आयोजित करण्यात येणार असून या यात्रेत संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील हिंदू धर्माभिमानी नागरिकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यात्रेची सुरुवात पारंपरिक पद्धतीने शंखनादाने करण्यात येणार असून सुमारे २० ते २५ जणांच्या सहभागातून शंखनाद करून यात्रेचा प्रारंभ केला जाणार आहे. शंखनादाच्या मंगल ध्वनीने हिंदू नववर्षाचे स्वागत करत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यात्रेत सहभागी होणारे नागरिक भगवे ध्वज हातात घेऊन तसेच स्वातंत्र्य योद्धे आणि हिंदू धर्म प्रणित महापुरुषांचे फोटो घेऊन यात्रेत सहभागी होणार आहेत. या माध्यमातून देशभक्ती, संस्कृतीचा अभिमान आणि हिंदू परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश समाजात पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच या स्वागत यात्रेदरम्यान लहान मुलांसाठी आकर्षक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत मुलांनी ऐतिहासिक, पौराणिक तसेच राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या सभेला ६० पेक्षा जास्त हिंदू धर्माभिमानी नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी यात्रेचे नियोजन अधिक शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी आपापले विचार मांडले. तसेच स्वागत यात्रा अधिक भव्य स्वरूपात काढण्यासाठी विविध समित्या स्थापन करून कार्यकर्त्यांमध्ये जबाबदाऱ्या वाटप करण्याचेही ठरविण्यात आले.
यावेळी बाबुराव खावणेकर यांनी यामागील भूमिका विषद करताना सांगितले की, हिंदू नववर्ष म्हणजे भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि आपल्या परंपरेचा गौरव करणारा दिवस आहे. आपल्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि समाजात एकात्मता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यात्रा यशस्वी करण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील सर्व समाजबांधव, युवक-युवती, महिला मंडळे तसेच विविध संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने यंदाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय होईल, असा विश्वास हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे संयोजक गिरीष गंगाधर फाटक यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा