केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस परीक्षा म्हणजे सर्वांचा चर्चेचा विषय. आयएएस ही देशातील सर्वोच्च परीक्षा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या परीक्षेचा दर्जा दुसऱ्या क्रमांकावर आहे पहिला क्रमांकवर फ्रान्स सिविल सर्विसेस आहेत.
या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात .पण मोजकेच उत्तीर्ण होतात आणि हजारच्या जवळपास विद्यार्थी आयएएस आयपीएस आयएफएस व तत्सम परीक्षेला पात्र ठरतात. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण फारच अल्प आहे पण तरीही या परीक्षेचे आकर्षण कालही होते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. लेटर एंट्रीमुळे थोडा उमेदवारांमध्ये नाव उमेदीचा सूर आलेला आहे. पण तरीही या परीक्षेकडे वळणाऱ्या उमेदवारांची संख्या ही लाखांच्या घरातच आहे.
अमरावतीच्या इतिहासात नमूद करण्यासारखी गोष्ट 28 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेली आहे. 2024 चे आयएएस चे निकाल जाहीर झाले. काही निकाल राखून ठेवण्यात आले होते. आणि ते निकाल उपरोक्त दिवशी जाहीर झाले. आणि अमरावतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात झळकले. कारण अमरावतीच्या पोस्ट खात्यात पोस्टवुमन म्हणून काम करणारी आमची रसिका मुळे नावाची मुलगी आयएएस ही परीक्षा पास झाली आहे. ती नुसती पास झाली नाही तर तिने राष्ट्रीय स्तरावर 87 वा क्रमांक प्राप्त केलेला आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रसिका म्हणजे एक आदर्श आहे. पोस्टवुमन म्हणून काम करीत असताना तिने या परीक्षेत संपादन केलेले यश अनन्यसाधारण आहे. भारतीय डाक व तार विभाग हा वेळेच्या बाबतीत सेवेच्या बाबतीत व तत्परतेच्या बाबतीत लोकांच्या सदैव चर्चेत राहिलेला आहे. आता मोबाईल आल्यामुळे या विभागाचे काम किंवा या विभागाचे आकर्षण कमी झाले असले तरी शासनाने पासपोर्ट व्यावसायिक सेवा बँकिंग सेवा सारख्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे
आपणास माहीत आहे की पोस्टमनला घरोघरी जाऊन पत्रे द्यावी लागतात .रजिस्टर पत्र द्यावी लागतात .मनी ऑर्डर्स द्यावी लागतात .पार्सल द्यावी लागतात .तसे पाहिले तर हे फिरस्तीचेच काम आहे. पण या फिरस्तीच्या कामावर असूनही रसिकाने जे यश संपादन केलेले आहे ते निश्चितच नमूद करण्यासारखे आहे. शिक्षकाचा व्यवसाय असला किंवा कार्यालयीन कामाचा व्यवसाय असला तर तो यूपीएससीला पूरक असतो. आमची वर्षा भाकरे नावाची विद्यार्थिनी अध्यापिका होती. ती पुढं एमपीएससी पास होऊन आता अमरावतीला जिल्हा नियोजन अधिकारी झालेली आहे .ती आपल्या भाषणामध्ये सांगते की मी शिक्षक असल्याचा मला भरपूर फायदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना झाला .पण पोस्टमन मध्ये तशी सोय नाही. आलेली पत्रे निवडणे ती नगराप्रमाणे लावणे व वितरित करणे यामध्ये अभ्यासाला वाव मिळण्याची शक्यता नाहीच. पण रसिकाने यावर मात केली आणि बाबा आमटे म्हणतात त्याप्रमाणे
शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन
दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही
या ओळीप्रमाणे ती काम करीत राहिली. मी लहान पोस्टवर आहे .माझ्यामागे काम खूप आहेत .अशा तक्रारी केल्यापेक्षा या तक्रारीवर मात कशी करता येईल .यासाठी तिने संकल्प सोडला आणि तो पूर्णत्वास देऊन दाखविला. बारावीच्या परीक्षेमध्ये तिने अमरावती विभागातून दैदिप्यमान यश संपादन केले होते आणि तेव्हाच आयएएस करण्याचा संकल्प तिने जाहीर केला होता .तिच्या वडिलांचे देखील हीच इच्छा होती की आपल्या मुलीने कलेक्टरची परीक्षा द्यावी.
बी.टेक. झाल्यानंतर तिने परीक्षा देण्यास सुरुवात केली. यश एकदमच मिळत नसते .यशासाठी अनेक टप्पे पार करावे लागतात आणि त्यात तर आयएएस ही भारतातील सगळ्यात मोठी परीक्षा .पहिल्या दोन प्रयत्नात तिला यश आले नाही. पण त्यामुळे ती खचून गेली नाही. तर त्यावर मात कशी करायची हे तिने ठरविले व ते अमलात आणले. या आय ए एस परीक्षेची तयारी करीत असताना तिला डाक व तार विभागाची पोस्टमनची नोकरी चालून आली . घरची परिस्थिती लक्षात घेता तिने ही नोकरी स्वीकारली. कारण ते गरजेचे होते. केवळ अभ्यास करून भागणार नव्हते .तर आर्थिक पायाही मजबूत करायचा होता. घरी पण मदत करायची होती.
विपरीत परिस्थिती असल्यामुळे ती आपली नोकरी सांभाळून आपला आय ए एस या परीक्षेचा अभ्यास प्रामाणिकपणे करीत राहिली .दोन वेळा नापास होऊनही ती नाराज झाली नाही तर तिला माहीत होते की माझ्या प्रयत्नांची फलश्रुती ही यशामध्येच होणार आहे.
2024 चा निकाल आला. तेव्हा त्यात तिचे नाव नव्हते .तिचा हा तिसरा प्रयत्न होता. निराश होणे साहजिकच होते. पण जे राखीव निकाल होते त्यामध्ये तिचे नाव होते आणि ते 28 ऑक्टोबर 2025 ला जाहीर झाले. घरोघरी पत्र वाटप करणाऱ्या पार्सल वाटप करणाऱ्या रजिस्टर पत्र पोहोचणाऱ्या रसिकाला केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या वर्तुळात सामावून घेतले. हा दिवस ती कधीही विसरू शकणार नाही.
निकाल लागला की सर्वच अभिनंदन करायला येतात. आणि ते सहाजिकही आहे आणि ते केलेही पाहिजे. कारण रसिकाच्या या यशातून भावी पिढी घडणार आहे .तिला प्रोत्साहन मिळणार आहे. स्थानिक आमदार तसेच पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील तिचा सत्कार केला तिला प्रोत्साहन दिले.
तिचा निकाल लागला तेव्हा मी राजस्थानमध्ये होतो. जोधपूरला माझे वास्तव्य होते. अमरावतीला आल्या आल्या मी माझे पोस्ट खात्यातील मित्र श्री नितीन पवित्रकार यांना फोन लावला. त्यांच्याकडून रसिकाचा फोन नंबर घेतला आणि रसिकाला फोन लावला. तो उचलला गेला नाही. मला वाटले की ते कामात असेल किंवा अनेक वेळा काही आयएएस झालेली मुले फोन उचलत नाहीत किंवा आपला मोबाईल नंबरही देत नाहीत. असा अनुभव मला देखील आलेला आहे. पण रसिकाच्या बाबतीत वेगळा अनुभव आला .एका मिनिटातच तिचा मला रिकॉल आला. मी तिचे अभिनंदन केले. व तिचा सत्कार मा. लेडी गव्हर्नर व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांच्या हस्ते करण्याचे तिला निमंत्रण दिले.
आमचा जो संवाद होता त्यामध्ये मी तिला आदरार्थी बोलत होतो .ती म्हणाली सर तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. मी तुमच्या मुलीसारखी आहे .मला फक्त रसिका म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी तिची विनयशीलता दिसून आली. आमच्या अमरावतीच्या ह्या कन्येने जे यश संपादन केलेले आहे ते खरोखरच आजच्या तरुण पिढी समोर युवकांसमोर आदर्श असे आहे. अनेक मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आमचे अमरावतीचे गाडगेनगर राठीनगर राधानगर तर या परीक्षांचा हब झालेले आहे. त्यातील जी मुले प्रामाणिकपणे अभ्यास करतात तीच उत्तीर्ण होतात. काही मुले तर पंचवटी चौकापासून कठोरा नाक्यापर्यंत असलेल्या हातगाड्यांवर सातत्याने खाताना दिसून येतात. आपले जीवन खाण्यासाठी आहे की अभ्यास करण्यासाठी याचा उलगडा अद्यापही त्या मुलांना झालेला नाही .ज्यांना झालेला आहे ती मुलं रसिकाच्या वर्गवारीत येतात आणि उत्तीर्ण होतात.
खरं म्हणजे अमरावती शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात वेगवेगळ्या शाळांमध्ये रसिकांना बोलावले पाहिजे तिचे अनुभव विद्यार्थ्यांना ऐकविले पाहिजेत. त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर तसेच महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर सौम्या शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगीता महापात्र ह्या सातत्याने स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम राबवित असतात. जिल्हाधिकारी श्री येरेकर तर इतर जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढेच टाकतात. आय ए एस चा निकाल लागल्यानंतर त्यांनी त्या मुलांचा सांस्कृतिक भवनमध्ये भव्य सत्कार आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. पुढचा सत्कार पुढचा कार्यक्रम चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेऊन त्यांनी विद्यार्थी आणि प्रशासन यामध्ये दुवा जोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे.
आमच्या अमरावती शहराची खरीखुरी आयडॉल म्हणजे रसिका मुळे आहे. अमरावतीच्या बडनेरा रोड वरील स्वस्तिक नगर मध्ये राहणाऱ्या या आमच्या कन्येने खरोखरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आपण स्वतः उत्तीर्ण होऊन एक आदर्श ठेवला आहे. आपण तिच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवू या .तिचे अनुकरण करू या आणि स्पर्धा परीक्षेतील अमरावती शहराचे स्थान अजून उंच नेऊ या. रसिकाला यानिमित्त हार्दिक अभिनंदन व तिच्या पुढील आयुष्यासाठी मनोमन शुभेच्छा…!
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
