बारामतीच्या ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आंबा शेतीचे वैज्ञानिक व्यवस्थापन; जिल्हा नियोजनातून ४.५ कोटींचा निधी
हवामान बदल व कीड समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा शोधण्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या हवामान बदल आणि नैसर्गिक संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडले असून बागायतदारांचे सुमारे ८५ टक्के नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा पिकाचे संरक्षण आणि कायमस्वरूपी तोडगा शोधण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची घोषणा केली आहे.
कणकवली येथील प्रहार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे यांनी सांगितले की, बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT) संस्थेच्या माध्यमातून आंबा शेतीचे व्यवस्थापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाणार आहे. जिल्ह्यातील ३४,२९६ हेक्टर आंबा क्षेत्राला हवामान बदल, कीड आणि अनिश्चित फुलोरा या समस्यांचा सामना करावा लागत असून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना केल्या जातील.
या प्रकल्पांतर्गत प्रत्येक झाडाचे निरीक्षण करणारी आणि दर ५०० मीटरवर अचूक हवामान माहिती देणारी प्रणाली विकसित केली जाणार आहे. या कामासाठी प्रति हेक्टर सुमारे ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मंत्री राणे म्हणाले, “आंबा उत्पादक शेतकरी कधीही मदतीसाठी हात पसरत नाही, मात्र सध्या परिस्थिती गंभीर आहे. महायुती सरकार बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे झाले नसतील तर त्या क्षेत्राची माहिती तातडीने द्यावी. राजकारण किंवा आंदोलनापेक्षा संवादातून मार्ग काढूया. माझे दरवाजे शेतकऱ्यांसाठी कायम खुले आहेत.”
दरम्यान, त्यांनी आंबा संशोधन केंद्राच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. “सरकार पगार देते, पण शेतकऱ्यांना आवश्यक माहिती मिळत नाही, हा ढिसाळ कारभार सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
याचबरोबर खासदार नारायण राणे यांनी सुचविल्यानुसार सिंधुदुर्गमध्ये आंबा-काजू यांसह कोकण मेव्याच्या संरक्षणासाठी एआय तंत्रज्ञानयुक्त आधुनिक प्रयोगशाळा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.
