*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या मराठी भाषेची*
माझ्या मराठी भाषेची माती गंधाळलेली
शब्दांतून झरते शपथ इतिहासाची,
रक्तात मिसळलेली शौर्याची साखळी
मनाच्या मुळाशी बांधलेली निष्ठेची..
माझ्या मराठी भाषेची तलवार तेजस्वी
वाक्यावाक्यात उभी जाणीव लढ्याची,
फक्त बोली नाही, तीच ओळख माझी
ठसा जिवंत देणारी जाणीव अस्मितेची..
माझ्या मराठी भाषेची वेदना सजग
शब्दात पिकलेल्या घामात शेतकर्याची,
सामान्यांच्या ओठावर उभी ठाकलेली
नेहमीच ती क्रांती अन्यायाविरुद्घची..
माझ्या मराठी भाषेची माया कठोर
कधी वाटते बोचरी म्हणून सत्याची,
गोडीपेक्षा जास्त धार जपणारी
सज्ज सदैव कठोर खरी स्वाभिमानाची..
माझ्या मराठी भाषेची लेखणी ज्वलंत
शब्दांतून पेटते मशाल परिवर्तनाची,
ती झुकत नाही,ती विकतही नाही
अखंड मशाल उंचावणारी विचारांची..
माझ्या मराठी भाषेची श्वासरेषा अमर
काळ बदलला तरी उभी ठाम राहण्याची,
जगाच्या गर्दीतही न हरवणारी
साक्ष उभी अखंड माझ्या अस्तित्वाची…!!
सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
