You are currently viewing हिंद दी चादर : मराठी मातीत गुंजणारा मानवतेचा झरा…

हिंद दी चादर : मराठी मातीत गुंजणारा मानवतेचा झरा…

विशेष लेख           

हिंद दी चादर : मराठी मातीत गुंजणारा मानवतेचा झरा…

महाराष्ट्राच्या मराठी मातीत क्रांतीकारी आणि अध्यात्माचा एक अद्वितीय संगम आहे. या मातीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची गाथा संपूर्ण देशभर पसरवली. याच मातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऐतिहासिक पराक्रम ऐकला आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अजोड बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतिहासिक औचित्यावर ‘हिंद दी चादर’ हा उपक्रम महाराष्ट्र शासन राबवित आहे. केवळ एका धार्मिक उत्सवाचा भाग म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एका विस्मृतीत गेलेल्या सुवर्ण धड्याची उजळणी होण्यासाठीच शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानंतर सुरु झालेला हा लोकजागर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामानवाचा आणि महाराष्ट्राचा असलेला एकअत्यंत घट्ट असा ऐतिहासिक बंध आहे. नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गुरु तेग बहादूरजींना ‘हिंद दी चादर’ म्हंटले जाते, कारण त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन मानवी हक्कांचे संरक्षण केले. परकीय राजवटीत जेव्हा अत्याचार झाले, तेव्हा स्वतःच्या धर्मासाठी नाही, तर दुसऱ्या धर्मातील श्रद्धेच्या रक्षणासाठी दिल्लीच्या चांदणी चौकात आपले शीर देणारा हा महान क्रांतिकारी संत होता.  महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत ह्दयस्पर्शी बाब म्हणावी लागेल. कारण ज्या काळात दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध तलवार घेऊन पराक्रमाची गाथा गात होते, त्यावेळी उत्तर भारतात गुरु तेग बहादूरजी आपल्या बलिदानातून ‘निर्भयता’ पेरण्याचे काम करत होते. या दोन्ही महान विभूतींचे ध्येय हे ‘धर्म आणि स्वराज्याचे रक्षण’ – करणे होय. हा ऐतिहासिक समानतेचा प्रवास आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेला प्रेरणा देणारा ठरतो.

या ऐतिहासिक पराक्रमाचे महत्त्व सध्याच्या धगधगत्या आणि विखूरलेल्या समाजात मांडणे अत्यंत महत्वाचे ठरेल.  ‘हिंद दी चादर’ उपक्रम केवळ शीख समुदायापूरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक भारतीयासाठी आहे. आजच्या पिढीला हे समजणे आवश्यक असून, आपण ज्या लोकशाहीत आणि धार्मिक स्वातंत्र्यात वावरतो, त्या प्रत्येक ठिकाणी याचे महत्व पटवून देणे तितकेच आवश्यक आहे. याची पायाभरणी अनेक बलिदानांतून झाली आहे. समाजातील लोकांसाठी या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘सर्वधर्मसमभावा’ची प्रत्यक्ष कृती यामधून अनुभवण्यास मिळते. जेव्हा कोणत्याही धर्माचा पाईक गुरुजींच्या बलिदानाचा इतिहास वाचतो, तेव्हा त्याला जाणवते की मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.

श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या कार्याशी महाराष्ट्राचा असलेला संबंध केवळ विचारांपुरता मर्यादित नसून तो भौगोलिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रेरणादायी आहे. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी आपले शेवटचे वास्तव्य महाराष्ट्रातील नांदेड येथे केले, जिथे आज ‘तख्त सचखंड श्री हुजूर साहिब’ विराजमान आहे. गुरु तेग बहादूरजींच्या तत्त्वांचा वारसा घेऊनच धाकटे गुरु महाराष्ट्रात आले. तसेच, शीख धर्माच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’ मध्ये महाराष्ट्राचे लाडके संत नामदेव महाराज यांची 61 पदे समाविष्ट आहेत. हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पंजाबला महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राला शीख धर्माशी कायमपणे जोडून ठेवतो. ‘हिंद दी चादर’ हा उपक्रम म्हणजे या ऐतिहासिक ऋणांनुबंधाची कृतज्ञतापूर्वक केलेली परतफेड म्हणावी लागेल.

ज्या महाराष्ट्राने नेहमीच अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा जपली, त्या महाराष्ट्रात गुरु तेग बहादूरजीं यांचे विचार घराघरात पोहचविणे म्हणजेच लोकशाही मूल्यांना बळकट करणे होय. या उपक्रमातून आपल्या चांगल्या विचारांची जडणघडण लाभते. ज्यावेळी न्याय आणि सत्याचा प्रश्न येतो, त्यावेळी त्याग हाच सर्वात मोठा विजय म्हंटला जातो. म्हणूनच, ‘हिंद दी चादर’ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उमटलेला एक झरा आहे, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना धैर्याने आणि स्वाभिमानाने, आत्मनिर्भयतेने जगण्याची वाट दाखवतो.

 

                                               संकलन:  रविंद्रकुमार सुंनदा नाना चव्हाण,

                                                               सहायक अधीक्षक,

                                                  विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 

प्रतिक्रिया व्यक्त करा