सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा हल्ला;
चार वर्षीय बालकाचा जीव सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलील यांनी वाचवला
सावंतवाडी (बाहेरचावाडा):
येथील बाहेरचावाडा परिसरात घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालत त्याच्या मानेचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलाच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता.
मुलाच्या जोरदार किंकाळ्या ऐकून परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या समीरा खलील यांनी प्रसंगावधान राखत आपल्या जीवाची पर्वा न करता कुत्र्याच्या तोंडातून त्या बालकाची सुटका केली. तत्काळ त्यांनी मुलाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्या मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सकाळपासून सहा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांनीही रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत शासनाने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व समीरा खलील यांनी केली आहे. या प्रसंगी समीर खलील व रवी जाधव यांनी जखमी बालकाच्या उपचारासाठी सहकार्य केले.
