वन्यप्राणी बचाव व मानव–वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनावर एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
सिंधुदुर्गनगरी
रेएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे (Resq Chritale Trust pune) यांच्या वतीने दिनांक 18 फेब्रुवारी रोजी वन्यप्राणी बचाव व मानव- वन्यजीव संपर्घ व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उपवनसंरक्षक सावंतवाडी वनविभाग, सावंतवाडी यांचे कार्यालयात यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती सावंतवाडी उपवनसंरक्षक (प्रादे.) मिलीश दत्त शर्मा यांनी दिली आहे.
सावंतवाडी वनविभागामार्फत वन्यप्राणी बचाव व मानव–वन्यजीव संघर्ष विषयावर RESQ Charitable Trust, पुणे येथील श्री. नचिकेत उत्पात, संचालक – मानवी–वन्यजीव परिसंवाद व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय प्रशिक्षणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सावंतवाडी वनविभागामध्ये मानव – वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला असल्याने विविध उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. उपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा वन्यप्राणी संकटात सापडला असल्यास, अशा वेळेत व योग्य प्रकारे वन्यप्राणी यांची सुटका करून नैसर्गिक अधिवसात मुक्त करणे आवश्यक असते. या प्रशिक्षणाचा उद्देश वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वन्यप्राणी बचावकार्य करताना आवश्यक असलेली तांत्रिक माहिती, सुरिक्षित उपाययोजना, आपत्कालीन परिस्थितीतील समन्वय, कायदेशीर तरतुदी तसेच मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी नियोजन याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. प्रशिक्षणामध्ये गवा, बिबट, बिबट्या, वाघ, माकड व साप आदी वन्यप्राण्यांच्या बचावकार्याची पद्धत, आवश्यक उपकरणांचा योग्य वापर, जनजागृतीचे महत्त्व आणि नागरिकांशी समन्वय कसा साधावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष केस स्टडीसह मार्गदर्शन केले. बचावकार्यादरम्यान स्वत:ची व नागरिकांची सुरक्षितता कशी राखावी, जखमी वन्यप्राण्यांना हाताळताना घ्यावयाची काळजी, तसेच संघर्षाची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर विशेष भर देण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य व आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. भविष्यात मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये अधिक परिणामकारक आणि सुरक्षित पद्धतीने कार्य करणे शक्य होणार आहे. कार्यक्रमास वनविभागाचे सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी व जलद बचाव पथकाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्यस्थितीत सावंतवाडी वनविभागामध्ये प्रत्येक वनपरिक्षेत्रस्तरावर एक याप्रमाणे एकूण 06 जलद बचाव पथक कार्यरत आहेत. या जलद बचाव पथकाच्या वतीने संकटात सापडलेले वन्यप्राणी यांची सुटका करुन नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या परिसरात वन्यप्राणी संकटात सापडेल्या आढळल्यास आपल्या वनपरीक्षेत्रातील जलद बचाव पथकाला संपर्क करण्यात यावा अथवा वनविभागाच्या टोल फ्री 1926 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आला आहे. जलद बचाव पथक संपर्क क्रमांक
| वनपरिक्षेत्र | तालुका | जलद बचाव पथकाचा क्रमांक |
| दोडामार्ग | दोडामार्ग | 9356157645 |
| आंबोली | सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावाशेजारील गावे | 9420208945 |
| सावंतवाडी | सावंतवाडी तालुक्याचा उर्वरित भाग | 9421129199 |
| कुडाळ | कुडाळ तालुक्याचा काही भाग, मालवण, वेंगुर्ला | 9422054694 |
| कणकवली | कणकवली, वैभववाडी, देवगड | 9527270831 |
| कडावल | कुडाळ तालुक्यातील कडावल गावाशेजारील गावे | 7350969218 |
00000000
