You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ७३ लिपिक पदांची परीक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ७३ लिपिक पदांची परीक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी

५०७७ अर्जांमुळे ५ ऐवजी १० परीक्षा केंद्रे; हॉल तिकीट २३ फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे सदर परीक्षा पूर्वी घेता आली नव्हती. मात्र आता आय.बी.पी.एस कंपनीकडून परीक्षा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

भरती जाहीर करताना सुरुवातीला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली होती. परंतु लिपिक पदासाठी जिल्हाभरातून तब्बल ५०७७ अर्ज प्राप्त झाल्याने उपलब्ध केंद्रांमध्ये सर्व उमेदवारांची व्यवस्था होणे शक्य नसल्यामुळे आणखी पाच नवीन परीक्षा केंद्रे वाढविण्यात आली आहेत.

त्यामुळे आता परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबई, म्हापसा, मडगाव व पणजी अशा एकूण दहा ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या हॉल तिकिटाबाबतचा संदेश त्यांनी अर्ज करताना नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर तसेच मोबाईल क्रमांकावर आय.बी.पी.एस कंपनीकडून पाठविण्यात येणार आहे. उमेदवारांचे हॉल तिकीट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sindhudurgdcc.bank.in� येथे आयबीपीएस लिंकवरून दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. आवश्यक मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग टाइमच्या किमान १५ मिनिटे आधी संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांनी आपला ई-मेल नियमित तपासावा व बँकेच्या संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे.

सर्व पात्र परीक्षार्थींनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षेत सहभागी व्हावे व उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा